गेल्या वर्षी २०१६ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे संबंध बऱ्याच कारणांनी विकोपास गेले आणि त्याचा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावाच्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम झाला तो म्हणजे कलाक्षेत्रावर. भारतीय चित्रपट आणि कलाक्षेत्रामध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या वावरावरही या सर्व घटनांमुळे चाप बसला. किंबहुना पाकिस्तानी कलाकारांना भारतात कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आली. असे असले, तरीही काही कलाकारांनी मात्र आजही या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांनी नुकतेच भारत-पाकिस्तानमधील सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध कायम जपले गेले पाहिजेत अशी आशा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी आशी आशा करतो की, सध्याची ही परिस्थिती लवकरच सुधारेल. ही गोष्ट खरी आहे की दोन्ही देशांमध्ये ही जी काही अशांततेची परिस्थिती उद्भवली होती ती दु:खदायक होती’, असे राहत फतेह अली खान यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दुरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. राहत फतेह अली खान यांच्या गायनशैलीला भारतीय प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर दाद देतात. सध्या ते ‘सावरे’ या गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. भारतीय संगीतकार- गीतकार अनुपमा रागच्या साथीने राहत यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे. टाइम्स म्युझिकमध्ये नुकतेच या गाण्याच्या व्हिडिओचे अनावरण करण्यात आले. राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील हे गाणे अभिनेता कुणाल खेमूवर चित्रित करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता आता राहत फतेह अली खान यांच्या या गाण्याला भारतीय प्रेक्षकांचे प्रेम मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याविषयी आणखीन बोलताना राहत फतेह अली खान म्हणाले, ‘कलाकारांचे काम कधीच थांबत नाही. मला नाही वाटत की या गाण्याचा विरोध करण्यात येईल. आम्ही (कलाकारांनी) नेहमीच प्रेमाच्या मार्गाची निवड केली आहे. पण, काहीजण या दोन राष्ट्रांमध्ये असणारा हा प्रेमळ दुवा नष्ट करु पाहात आहेत’.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahat fateh ali khan wants to maintain bridge of love between india and pakistan
First published on: 22-01-2017 at 09:54 IST