Jyoti Chandekar Death News: सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. आज पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी येथील विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर दाहसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक लोक उपस्थित होते. तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही यावेळी अंत्यदर्शन घेतले.
ज्योती चांदेकर यांची मुलगी तेजस्विनी पंडित यावेळी आपले अश्रू रोखू शकली नाही. आपल्या आईला मुखाग्नी दिल्यानंतर तेजस्विनीच्या अश्रूंचा बांध फुटला.
ज्योती चांदेकर आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केले होते. गेल्या अडीच वर्षांपासून ज्योती चांदेकर महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून ओळख निर्माण झालेल्या ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांनी साकारलेल्या पूर्णा आजीच्या भूमिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळाले. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील कलाकार आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.
तेजस्विनी पंडितची आईसाठी खास पोस्ट
आईच्या निधनानंतर तेजस्विनीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी आज १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झालं आहे.”
ज्योती चांदेकर यांच्याविषयी…
ज्योती चांदेकर यांनी ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’, ‘सुखान्त’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. तसेच रखेली, मादी, जंगली कबुतर अशा चाकोरीबाहेरल नाटकांतूनही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
दोन महिने घेतला होता लोकप्रिय मालिकेतून ब्रेक
‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी मध्यंतरी प्रकृतीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. अमोघ पोंक्षे यांच्या द केक्राफ्ट या युट्यूब वाहिनीशी संवाद साधताना ज्योती चांदेकर यांनी आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.
“आमचं शूटिंग सुरू असतानाच मी बेशुद्ध पडले. माझ्या शरीरातलं सोडिअम कमी झालं होतं. त्यानंतर या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी एवढी धावपळ केली. सगळे लोक घाबरले होते, मला लगेच रुग्णालयात दाखल केलं, उपचार सुरू झाले. मला बरं वाटल्यावर मी पुन्हा सेटवर परतले. हा झाला पहिला किस्सा, यानंतर दुसऱ्यावेळी तर मी अगदी वर जाऊनच परत आले असं म्हणायला हरकत नाही”, असे ज्योती चांदेकर म्हणाल्या होत्या.
“मी दोन महिने आजारी होते. खरंतर कोणत्याही मालिकेची टीम, कोणत्याही कलाकारासाठी २ महिने थांबत नाही. पण, ही सगळी मंडळी माझ्यासाठी २ महिने थांबली. या सगळ्यांनी मालिका एवढी पुढे नेली… आणि या सगळ्यात कोणालाही माझ्या पात्राची कमतरता भासली नाही.” असं ज्योती यांनी सांगितलं होतं.