अभिनय क्षेत्रासोबतच समाजसेवेसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत रजनीकांत यांच्या नावाची नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाही. आपल्या हटके अभिनयाने रजनीकांत यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीप्रमाणेच सामाजिदृष्ट्या महत्त्वाच्या कामांना हातभार लावण्यासाठी थलाईवा रजनी नेहमीच पुढे असतात. आता ते आणखी एका सामाजिक कार्याचा भाग होणार आहेत. रजनीकांत यांच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेद्वारे राबवण्यात आलेल्या एका उपक्रमाअंतर्गत श्रीलंकेतील तामिळ कुटुंबांमध्ये १५० मोफत घरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लायका प्रॉडक्शनच्या नानम फाऊंडेशनद्वारे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. काही दिवसांत पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला श्रीलंकेतील प्रसिद्ध नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. श्रीलंकेतील तामिळ समुदायाविषयी रजनीकांत यांच्या मनात अपार सहानुभूती असून ते नेहमीच या समुदायाच्या मदतीसाठी पुढे सरसावत असतात, अशी माहिती रजनीकांत यांच्या एका निकटवर्तीयाने दिल्याचे वृत्त ‘एचटी’ने प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, लायका प्रॉडक्शनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकामध्ये घरांच्या लोकार्पणासंबंधीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. या पत्रकात म्हटल्याप्रणाणे ९ एप्रिलला श्रीलंकेतील जाफना येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. फार वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी श्रीलंकेत भेट दिली होती. त्यानंतर जवळपास तीस वर्षांनी ते पुन्हा एकदा श्रीलंकेत जाणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांचा हा दौरा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

सुपरस्टार रजनीकांत आगामी ‘२.०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटाचे सध्या चेन्नईमध्ये चित्रिकरण सुरु आहे. ‘एन्थिरन’चा सिक्वल असलेल्या ‘२.०’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात अव्वज दर्जाचे ग्राफिक्स वापरले जाणार असून, या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पहिल्यांदाच खलनायक म्हणून रजनीकांत यांच्यासमोर उभा ठाकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth to inaugurate 150 free homes to sri lankan tamils
First published on: 24-03-2017 at 17:14 IST