‘आकडा’ ही गाजलेली एकांकिका ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकातून रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवल्यानंतर लेखक आणि अभिनेता राजकुमार तांगडे आता चित्रपटाकडे वळला आहे. ‘चिवटी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे.
सामाजिक जाणीव असलेला रंगकर्मी म्हणून राजकुमार तांगडेची ओळख आहे. त्याने केलेल्या कलाकृतीतूनही त्याची सामाजिक, राजकीय समज दिसली आहे. आता त्यापुढे पाऊल टाकत तो चित्रपटाकडे वळला आहे. साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे का आणि त्यामागे होणारं राजकारण असं वेगळ्याच धाडणीचं कथानक घेऊन तो ‘चिवटी’ हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद याचं लेखनही त्यानंच केलं आहे. या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच बीड इथं झाला. चित्रपटाचं चित्रीकरण बीड, जालना आणि महाबळेश्वर इथं केलं जाणार आहे.
प्रगती चित्र संस्थेच्या अजिनाथ ढाकणे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर, गौरी कोंगे, गजेंद्र तांगडे, मधुकर बिडवे, अशोक देवकर, देवकी खरात आणि किशोर उढाण आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. देवेंद्र गोलतकर छायालेखन करत असून, भगवान मेदनकर कार्यकारी निर्माते आहेत.
जालन्यासारख्या भागात नाटकाचं वातावरण तयार करण्यात राजकुमारचा मोठा वाटा आहे. आकडा या एकांकिकेतून त्यानं वीजचोरीचा प्रश्न हाताळला होता, तर ‘शिवाजी अंडरग्राउंड..’ च्या माध्यमातून त्यानं सध्याची सामाजिक परिस्थिती परखडपणे मांडली होती. त्यानं रंगभूमीवर केलेल्या कामाचं कौतुक झालं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून तो काय वेगळं भाष्य करतो, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2016 रोजी प्रकाशित
राजकुमार तांगडे करतोय ‘चिवटी’!
सामाजिक जाणीव असलेला रंगकर्मी म्हणून राजकुमार तांगडेची ओळख आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 23-05-2016 at 16:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkumar tangde directing movie chivti