‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातील अभिनेता राजकुमार राव आणि त्याची सहकलाकार पत्रलेखा यांच्या अफेअरबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळाल्या. पाच वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र लग्नाची घाई नसल्याचे राजकुमारने स्पष्ट केले आहे.

अफेअरबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतानाच या चर्चा बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्याचा एक भागच असतात आणि त्यांचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होऊ देत नसल्याचे त्याने सांगितले. ‘आमच्याबद्दल अनेक गोष्टी मला वाचायला मिळतात. आमचे लग्न झाले असेही अनेकांना वाटते. मात्र मला हेच सांगायचे आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये खूश आहोत. जिमबाहेर आम्ही कशाप्रकारे भांडत होतो अशा अनेक बातम्या वाचल्या होत्या. मात्र त्यांना कधीही प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटले नाही,’ असे राजकुमारने म्हटले.

अफवांवर स्पष्टीकरण देत तो पुढे म्हणाला की, ‘ठराविक वेळानंतर या चर्चांचा काही परिणाम होत नाही. सत्य काय हे आम्हाला ठाऊक आहे. जोपर्यंत आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत, तोपर्यंत आम्हाला कोणालाही काहीही सांगायची गरज नाही.’

राजकुमार आणि पत्रलेखा सध्या कामावर लक्ष केंद्रीत असून विवाहबंधनात अडकण्याच्या घाईत नाहीत. दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना उत्सुकता असतानाच राजकुमारने स्पष्ट केले की, ‘जेव्हा व्हायचे आहे तेव्हा लग्न होईल. सध्या आम्ही कामात लक्ष देत आहोत. आमचे कुटुंबियही संयमाने वाट पाहत आहेत. त्यांचीही सध्या आम्ही चांगले काम करावे अशी इच्छा आहे.’

वाचा : ‘विमानात नेमके काय घडले याची खरी माहिती कोणाकडेच नाही’

दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला राजकुमार राव नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारण्यासाठी सध्या खूप मेहनत करत आहे. नुकतेच राजकुमारने ‘बहन होगी तेरी’ आणि ‘राबता’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. ‘राबता’ या चित्रपटात त्याने ३२४ वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली होती.