रणबीर कपूर, कतरिना कैफ, मनोज वाजपेयी, अजय देवगण, अर्जुन रामपाल अशी भलीमोठी कलाकार मंडळी घेऊन केलेला ‘राजनीती’ हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो. सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवू पाहणाऱ्या चित्रपटांकडे सहसा मोठय़ा कलाकारांचे फारसे लक्ष जात नाही. ‘राजनीती’ने हे सारे मुद्दे बाजूला टाकत प्रकाश झा यांना आणि त्यांच्या कलाकारांनाही लौकिक मिळवून दिला. गेली अनेक र्वष या चित्रपटाचा सिक्वल करावा, अशी मागणी त्यांच्याकडे होते आहे. सध्या ‘जय गंगाजल’च्या प्रदर्शनाकडे नजर लावून असलेल्या झा यांनी आता ‘राजनीती’चा सिक्वल करण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्या दृष्टीने काम सुरू होत असल्याचे संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट हे एका अर्थाने समाजाचा आरसा असतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्या चित्रकृतीतून उमटणार नसतील तर त्याला महत्त्व उरतेच कुठे? असा खडा सवाल प्रकाश झा करतात. मला जे दिसते, जे पटते, जे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो विचार माझ्या चित्रपटातून मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो, असे म्हणत आजवर सामाजिक मुद्दय़ांवर, विषयांवर चित्रपट बनवण्याचा दिग्दर्शक म्हणून घेतलेला वसा त्यांनी सोडलेला नाही. २००३ साली अजय देवगणचा ‘गंगाजल’ आला होता. त्यानंतर १३ वर्षांनी ‘जय गंगाजल’ हा चित्रपट झा यांनी केला आहे. मात्र हे दोन्ही चित्रपट पोलीस अधिकाऱ्याची कथा सांगतात ही एक गोष्ट सोडली तर दोन्ही चित्रपट पूर्णत: वेगळे असल्याचं झा यांनी सांगितलं. त्यांच्या छोटेखानी पण कलात्मकतेने सजवलेल्या कार्यालयात बसलेल्या प्रकाश झा यांचे विचार त्यांच्या चित्रपटांइतकेच थेट आणि सरळ आहेत. गुंतागुंतीच्या कथा किंवा उगीच कल्पक मांडणी या गोष्टी त्यांना फारशा मानवत नाहीत. किंबहुना एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास आणि संशोधनातून त्यांच्या कथा जन्माला येतात. ‘गंगाजल’ चित्रपटात भागलपूर ब्लाईंडिंग केसच्या माध्यमातून पोलीस, प्रशासन आणि समाज यांची कथा लिहिली गेली होती. तेरा वर्षांत पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती आलेली सत्ता, प्रशासन व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. त्यावेळी एसपी अमित एकूणच प्रशासनाविरुद्ध लढण्याच्या बाबतीत हतबल होता. आज पोलिसांकडे ताकद आहे, शस्त्रे आहेत, पण अधिकार मात्र नाहीत किंवा त्यांना ते वापरायचे नाहीत, असे झा म्हणतात. मी स्वत: असे पोलीस अधिकारी पाहिले आहेत ज्यांनी मनात आणले तर ते खूप काही करू शकतील. मात्र आपल्या कारकिर्दीवर कु ठलाही डाग न पडता, आपला सेवाकाल पूर्ण करून आरामात जीवन जगण्याच्या इच्छेने अधिकारी केवळ आपली सेवा पूर्ण करतात, ते त्या चौकटीपलीकडे जाण्याचा धोका पत्करत नाहीत. ‘जय गंगाजल’ पाहताना तुम्हाला परिस्थितीतला हा बदल प्रकर्षांने जाणवेल, असे झा यांनी सांगितले.

कुठल्याही अर्थाने ‘जय गंगाजल’ हा सिक्वल नाही, असे ते आग्रहाने म्हणतात. मागच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा किंवा त्यांचे, कथेचे काही संदर्भ नव्या चित्रपटात असतील तर तो सिक्वल आहे हे म्हणणे योग्य ठरते. ‘जय गंगाजल’ची कथा पूर्ण वेगळी आहे. ही एसपी आभा माथुर या महिलेची कथा आहे. गंगेचे पाणी सगळा कचरा वाहून नेते म्हणतात, प्रवाह शुद्ध होतो या अर्थाने पोलिसांची समाजातील जी भूमिका असायला हवी ती या गंगेच्या पाण्याची आहे म्हणून चित्रपटाच्या नावात ‘गंगाजल’ आहे. हे इतके समर्पक नाव आहे की दुसऱ्या कुठल्याही नावाचा विचार करू शकलो नसतो पण सिक्वल नाहीत, असे ते पुन्हा पुन्हा सांगतात. ‘जय गंगाजल’मध्ये प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे, असा उल्लेख केल्यावर हा चित्रपट तिचाच होता, असे ते सांगतात. ‘तुम्ही कतरिना, दीपिका, करीना अशा सगळ्यांबरोबर काम केले आहे. मीच का मागे राहिले? असा प्रश्न प्रियांका सतत करत होती. त्यामुळे ‘जय गंगाजल’च्या कथेची सुरुवात झाली तेव्हा ती हटूनच बसली होती. उलट मला असे वाटत होते की प्रियांका आंतरराष्ट्रीय मालिका, चित्रपट यात व्यग्र असल्याने ती काम करणार नाही. तिचा धोशा होता मी काहीही करेन, पण ‘जय गंगाजल’ मीच करणार..’ हा चित्रपट तिचाच होता, असे त्यांनी सांगितले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ‘मेरी कोम’ चित्रपट क रताना तिने जी काही मेहनत केली होती त्यामुळे तिची शरीरयष्टी वेगळ्या प्रकारे विकसित झाली होती. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका रंगवताना त्याचा योग्य वापर होणार होता. प्रियांकावर मेहनत घेतली ती म्हणजे पोलिसांची देहबोली, ते त्यांच्या खादी वर्दीत कसे वावरतात, कसे बोलतात, वागतात या सगळ्याचे रीतसर प्रशिक्षण तिला देण्यात आल्याचे झा यांनी सांगितले.

आजवर दिग्दर्शक म्हणून जे चित्रपट करायचे होते ते करण्याची आणि तेही अजय, रणबीर, अमिताभ बच्चन, सैफ अली खान यांच्यासारख्या मोठय़ा कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मात्र ‘राजनीती’सारखा यशस्वी चित्रपट करायचा आहे. ‘राजनीती’च्या सिक्वलच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यानच्या काळात तुलनेने छोटे पण वेगळ्या विषयावरचे चित्रपट हातावेगळे होतील, अशी माहिती झा यांनी दिली.

..तो एक विनोदच   

‘जेएनयू’वरून जे काही सुरू आहे तो विनोद आहे असे मी म्हणालो. यात काय चूक आहे? तिकडे रोहित वेमूलसारखा विद्यार्थी मरतो. त्या मुलाला आयुष्य जगण्यापेक्षा मरणाचा मार्ग का स्वीकारावासा वाटला? त्यामागची कारणे काय होती?, हे शोधून काढण्यात किंवा त्यावर विचार करण्यात कोणाला रस नाही. उलट, त्याच्यावरही राजकारण केलं गेलं, सहिष्णूतेचा मुद्दा थांबला नाही तर आता आपण राष्ट्रीयत्वाच्या मुद्दय़ावर विनाकारण चर्चा करतो आहोत. ही सगळी परिस्थिती म्हणजे विनोदच आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अभिनय करून दाखवा’

प्रकाश झा पहिल्यांदाच स्वत:च्या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेवरून खुद्द प्रियांकानेच त्यांना आव्हान दिले होते, याची आठवणही त्यांनी सांगितली.  ती मला नेहमी म्हणायची, ‘दिग्दर्शक म्हणून तुम्ही बॉस आहात, तुम्ही जे सांगाल ते मला करावेच लागेल. एकदा अभिनयाच्या रिंगणात उतरून बघा. इथे गाठ माझ्याशी आहे. माझ्यापेक्षा चांगले काम तुम्ही करूच शकणार नाही’, असे सतत सेटवर ती हसतखेळत आव्हान देत रहायची. माझ्यासाठी चित्रपटातली ही भूमिका अवघड नव्हती. कारण जवळपास दोन ते तीन र्वष मी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर वावरलो आहे. त्यामुळे त्यांच्या गोष्टी मला माहिती आहेत त्या फक्त कॅ मेऱ्यासमोर करायच्या होत्या.. असे सांगत अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी तितक्याच झपाटय़ाने आपण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajneeti movie sequel may come
First published on: 28-02-2016 at 02:44 IST