रामगोपाल वर्माची नेमकी काय समस्या आहे हे खुद्द तो तरी सांगू शकेल काय, असा प्रश्न पडलाय. तसा तो खूपच कमी बोलतो असा त्याच्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला भेटल्यावर जाणवते. त्यात तो चेहर्‍यावर कसलेच भाव आणू देत नाही. त्यामुळे तर त्याच्या मनात काय चाललंय हेच समजायला मार्ग नसतो. आणि कोणीही भेटल्यावर त्याला कसा आहेस वगैरे कसलीही चौकशी न करता थेट मुद्द्याचे बोलायचे हे वैशिष्ट्य. असे सगळे असूनही ट्विटरवर त्याचा तोल का सुटावा? सोशल साइट्सवर आपलेही अस्तित्व असावे म्हणून कार्यरत रहावे म्हणून त्याला बोलावेसे वाटतेय की आपल्या बोलण्याचे काही वेगळेच अर्थ अनर्थ निघतात याचे त्याला भान नाही ? बरेच दिवसात त्याच्या दिग्दर्शनाचे कसब दिसणारा त्याचा चित्रपट न आल्याचाही परिणाम असू शकतो. महिला दिनानिम्मितचे ट्विट तर तेच सूचित करतय का? सनी लिओनीप्रमाणे स्त्रियांनी पुरुषांना खूश ठेवावे असे म्हणताना त्याला नेमके काय साध्य करायचंय हे स्पष्ट न झाल्याने वाद निर्माण झाला. सांस्कृतिक चर्चेकडून सामाजिक राजकीय असे वळण घेतल्याने रामूचीच कोंडी झाली. या अनुभवातून तो खरंच काही शिकलाय अथवा नाही हे लक्षात यायला त्याच्या नवीन ट्विटरची वाट पाहूयात.

सोशल नेटवर्किंग साइट्स स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम असले तरी ते स्वतःपुरते राहत नाही तर आपण त्याच माध्यमातून दूरवर पोहचतोय व त्याच एका वाक्यातून नेमका कोण कसा संदर्भ घेईल हे सांगणे अवघड आहे. म्हणूनच तर या सोशल साइटवर बोलताना थोडा संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहेच. कपिल शर्मा, ऋषी कपूर यांच्याही ट्वीटवरुन गदारोळ उठूनही रामू सावध होऊ नये हे जास्तच दुर्दैवाचे आहे. अथवा आपल्याच ट्वीटचा त्यालाच अर्थबोध होत नसावा. हे जास्तच चिंताजनक आहे. अशा परिस्थितीतही राखी सावंतनेच त्याला समर्थन देणे कौतुकास्पद नाही तर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यालाच त्याची चूक दाखवून सामाजिक गोष्टींवर भाष्य करताना डोके ठिकाणावर ठेव असे सांगायला हवे होते. खासगीत तसे झालेही असेल पण अशा वादात अन्य कोणीही उघडपणे शक्यतो पुढे येत नाहीत. माध्यमे व राजकीय शक्ती यांचा आपण सामना करु शकत नाही हे जणू त्यानी अगोदरच ओळखले असते. त्यात रोजच उलटसुलट पडणारी भर मूळ विषयच हरवून टाकणारी ठरते. याचा तेवढ्याच हुशारीने प्रतिकार करण्याचे अस्सल कसब व कौशल्य किती सिनेमावाल्यांकडे आहे ? ट्विट करायला अनेक संधी आहेत हे अमिताभ बच्चनच्या आदर्श उदाहरणातून रोजच दिसते. ते वाचले तरी खुबीने बोलायचे वा सांगायचे कसे याचे धडे गिरवता येतील.

रामू दृश्य माध्यमाची चांगली जाण असणारा दिग्दर्शक. आपल्या चित्रपटातून विषयाची केवढी तरी विविधता त्याने दिलीय. विशेष म्हणजे स्त्री केंद्रित काही चांगले चित्रपटही त्याने दिलेत. ,’रात’ व ‘भूत’मध्ये नायिकेला भूतबाधा होते. ‘रंगीला’मधे योगायोगाने मध्यमवर्गीय युवती चित्रपट तारका बनते. ‘मस्त’मधे चित्रपट अभिनेत्री आपल्या चाहत्याच्या घरात मुक्काम करते अशी फॅन्टसी, ‘सत्या’ या गॅगस्टरला मध्यमवर्गीय गीताच समजवून घेते. ‘कौन’ची स्क्रिनोफेझिक नायिका, ,’नाच’ची नृत्य तारा … रामूच्या दिग्दर्शनात केवढी तरी ही स्री रुपे आहेत. यातील रातमध्ये गौतमी होती. तर ‘नाच’मध्ये अंतरा माळी. इतर सर्व चित्रपटात उर्मिला मातोंडकर आहे. तिच्या अभिनय अष्टपैलुत्व व सौंदर्यातील धीटपणा याचा अत्यंत चांगला प्रत्यय रामूच्या दिग्दर्शनात दिसला. या दिग्दर्शक व अभिनेत्री जोडीचे ‘द्रोही’, ‘दौड’ असे आणखीनही काही चित्रपट आहेत. रामूचे चित्रपट दिग्दर्शनाचे प्रगती पुस्तक सरकार, रामगोपाल वर्मा के शोले, सरकारराज, डरना जरुरी है असे करत करत पुढे सरकताना त्याचा काहीसा दर्जादेखिल उतरला. काही चित्रपट ( एक हसिना थी इत्यादी) त्याने आपल्या सहाय्यकांना दिग्दर्शनाठी देताना शक्य तेथे नायिकाप्रधान हा गुण जपला. तरी त्याला सनी लिओनी का बरे आदर्श वाटावी? स्त्रीत्वाचा त्याला विसर पडलाच कसा? तो बाह्यआकर्षणावर का घसरावा? स्त्रीचे मन, भावना, अस्तित्व, स्वाभिमान याकडे त्याचे दुर्लक्ष व्हावे हे कोणत्याही व्यक्तीला अजिबात पटणारे नाही. त्यात सनी लिओनी पाॅर्न स्टार. त्यामुळे अधिकच आक्षेप. सनीची इमेज व प्रत्यक्षातील ती यात पुन्हा फरक आहे. रामू सनीच्या प्रतिमेवर इतका कसा भाळला व सवंग झाला?

सोशल नेटवर्किंग काळात अशा गोष्टींवर भरभरून प्रतिक्रिया उमटत जातात. त्या एका वादातून नवा वाद निर्माण करतात. ‘सरकारराज ३’च्या पूर्वप्रसिध्दीत या सार्‍यावर रामूला जी उत्तरे द्यावी लागतील, ती याच चित्रपटावरचा फोकस बाजूला टाकणारी ठरली तर…… कुठे ना कुठे रामूला सनी लिओनी ट्विटवर प्रश्न होणे अपेक्षित आहेच. तेथे त्याला स्वतःसह चित्रपटाचा बचाव करता आला नाही तर असेच म्हणावे लागेल ट्वीटवरुन भाष्य करणे चित्रपट निर्मिती दिग्दर्शनाच्या ‘फॅक्टरी’पेक्षाही अवघड आहे. ते वाटते खूप साधे पण नेमक्याच शब्दात व्यक्त होणे जास्तच कठीण आहे. त्यापेक्षा न बोललेलेच बरे. जे काही सांगायचंय त्यासाठी चित्रपट माध्यम आहेच ना त्याच्याकडे?

-दिलीप ठाकूर