रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेने अनेकांची मनं सहज जिंकून घेतली आहेत. ८०-९० चा काळ गाजविणारी ही मालिका सध्या लॉकडाउन असल्यामुळे पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेचीच चर्चा आहे. या मालिकेसोबतच तब्बल ३३ वर्षांनंतर मालिकेतील सगळेच कलाकार प्रकाशझोतात आले आहे. यात अरुण गोविल हे सोशल मीडियावर सक्रीय झाले असून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. चाहत्यांशी संवाद साधत असताना त्यांनी करोना विषाणूपासून कशी सुटका होईल हे सांगितलं आहे.

सध्या अभिनेता अरुण गोविल सोशल मीडियावर सक्रीय असून ते ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यामध्येच चाहतेदेखील #AskArun या हॅशटॅगअंतर्गंत त्यांच्या मनातील प्रश्न बिनधास्तपणे अरुण यांना विचारत आहेत. यामध्येच एका चाहत्याने देशावर ओढावलेलं करोनाचं संकट कधी पाठ सोडेल असा प्रश्न विचारला. त्यावर अरुण गोविल यांनी छान उत्तर दिलं.

‘देवा हे करोनाचं संकट कधी टळणार’, असा प्रश्न चाहत्याने अरुण यांना विचारला. त्यावर ‘सगळेच प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येईल आणि करोना लवकरच सगळ्यांची पाठ सोडेल’, असं उत्तर अरुण गोविल यांनी दिलं.

दरम्यान, ‘रामायण’ ही मालिका सुरु झाल्यापासून प्रत्येक जण आवडीने ही मालिका पाहत आहे. त्यामुळेच सध्या टीआरपीच्या शर्यतीमध्ये ही मालिका प्रथम स्थानावर आहे. विशेष म्हणजे या मालिकेने सर्वाधिक व्ह्युज मिळवून विश्वविक्रम केला आहे. १६ एप्रिल रोजी या मालिकेला ७.७ कोटी व्ह्युज मिळाले आहेत.