करण जोहरच्या ‘शुद्धी’ या आगामी चित्रपटाची घोषणा करून अनेक दिवस झाले असून, अद्याप या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झालेली नाही. या चित्रपटात हृतिक रोशन आणि करिना कपूर-खान ही प्रमुख जोडी काम करणार होती, परंतु, चित्रपटाचे काम सुरू होण्यास होत असलेल्या सततच्या दिरंगाईने करिना कपूर या चित्रपटातून बाहेर पडली. तिच्यापाठोपाठ चित्रपटातील प्रमुख अभिनेता हृतिक रोशनदेखील तारखांच्या कारणामुळे चित्रपटातून बाहेर पडला आहे. ‘शुद्धी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल, त्यावेळी आपण या चित्रपटात काम करू शकू का, या विषयी आपल्याला खात्री नसल्याचे अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत करिना म्हणाली होती. जवळजवळ दीड वर्ष या चित्रपटाच्या कामाला सुरूवात न होऊ शकल्याने, या चित्रपटाच्या कामाला कधी सुरुवात होईल, हे मला सांगता येत नाही. मी करण जोहरला भेटले नाही आणि हृतिक ‘बॅंग बॅंग’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. जेव्हा कधी या चित्रपटाच्या कामाला सरूवात होईल, त्यावेळी हा चित्रपट करायचा का नाही याबाबत मी निर्णय घेणार असल्याचे करिना म्हणाली. हृतिकने देखील याबाबतचे आपले निवेदन जाहीर केले. तारखांच्या कारणामुळे आपण ‘शुद्धी’ चित्रपटाचा भाग होऊ शकत नसल्याचे त्याने या निवेदनात म्हटले आहे. हृतिक सध्या शिमला येथे कतरिना कैफबरोबर ‘बॅंग बॅंग’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्यामुळे या चित्रपटाला अजून उशीर होऊ नये, म्हणून आपण या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे त्याने म्हटले आहे. हृतिक रोशनच्या डोक्याला झालेली दुखापत या प्रमुख करणास्तव करण जोहर निर्मित ‘शुद्धी’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात करणे अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले.
आता मिळालेल्या माहितीनुसार ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही हीट-जोडी ‘शुद्धी’ चित्रपटात देखील प्रमुख जोडी म्हणून दिसणार आहे. रणबीर आणि दीपिका ही जोडी ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच करण जोहरच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात एकत्र दिसली. चित्रपटातील या जोडीची जादू प्रेक्षकांवर अशी काही चालली की या चित्रपटाने २०१३ सालच्या हीट चित्रपटांमध्ये स्थान पटकावले. चित्रपटाच्या यशाबरोबर रणबीर आणि दीपिकामधील केमेस्ट्रीची देखील चर्चा होऊ लागली. २०१० साली झालेल्या त्यांच्या ब्रेकअपनंतरचा ‘ये जवानी है दीवानी’ हा त्यांचा पहिला एकत्रित चित्रपट होता. ‘शुद्धी’ चित्रपटाशिवाय इम्तियाझ अलीच्या ‘विंण्डो सीट’ या चित्रपटातदेखील हे दोघे एकत्र दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या वर्षी चित्रीकरणाला सुरूवात होणारा ‘शुद्धी’ हा चित्रपट २०१५ साली चित्रपटगृहात दाखल होण्याची शक्यता आहे.