‘जग्गा जासूस’नंतर रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृष्यांच्या शूटिंगसाठी रणबीर सध्या न्यूयॉर्कला गेलाय. चित्रपटात रणबीर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. संजय दत्तच्या लूकसाठी रणबीर खूप मेहनत घेतोय. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वजन वाढवण्याचं ट्रेनिंग. रणबीर सोशल मीडियावर नसल्याने त्याचा प्रशिक्षक कुणाल गिर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
रणबीरचे हे फोटो पोस्ट करत कुणालने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘१६ तासांच्या दीर्घ विमानप्रवासानंतरचा हा फोटो आहे. प्रवासानंतर नाश्ता केला आणि थेट जिममध्ये गेलो. रणबीर त्याच्या कामाशी खूप एकनिष्ठ असतो.’ यातूनच रणबीर लूकसाठी किती मेहनत घेतोय हे स्पष्ट होतंय. रणबीरचे हे फोटो खरंच थक्क करणारे आहेत. ‘चॉकलेट बॉय’ अशी इमेज असणारा रणबीर आता या लूकमध्ये ‘रफ टफ बॉय’ दिसतोय.
वाचा : कपिलच्या ट्विटला सुनीलने असं दिलं उत्तर
या बायोपिकचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार असून यामध्ये विकी कौशल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे टप्पे पाहायला मिळणार आहेत. त्याचं करिअर, जीवनातील चढउतार, कारागृहातील दिवस, ड्रग्सच्या अधीन गेलेला संजय या सर्व घटना चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत.