एकेकाळी लाखो तरुणींना घायाळ करणारा अभिनेता आर. माधवन आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असलेल्या माधवनचे आज असंख्य चाहते आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांव्यतिरिक्त माधवनने बॉलिवूडमधील काही चित्रपट केले आहेत. मात्र अभिनेता होण्यापूर्वी माधवनने एका वेगळ्या क्षेत्राचं स्वप्न रंगवलं होतं. त्या अभिनेता होण्याऐवजी देशसेवेला वाहून घ्यायचं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधवनचा जन्म १ जून १९७० रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला. माधवनचं खरं नाव रंगनाथन माधवन असं असून रंगनाथन हे त्याच्या वडीलांचं नाव आहे. मात्र लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या माधवनाला चाहत्यांनी विविध नावं दिली आहेत. त्यात ‘मॅडी’, ‘मॅडी भाई’, ‘मॅडी पाजी’, ‘मॅडी भाईजान’, ‘मॅडी सर’, ‘मॅडी चेट्टा’, ‘मॅडी अण्णा’ अशी अनेकविध नावाने चाहते त्याला संबोधत असतात. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधवनने त्याच्या करिअरची सुरुवात कोल्हापूरमध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर त्याने मुंबईमधील के.सी. कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंग या विषयात पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण करत असतानाच त्याने त्याचा पोर्टफोलिया करुन एका मॉडलिंग एजन्सीला दिला होता.

१९९६ मध्ये माधवनने पहिल्यांदा एका चंदन पावडरच्या जाहिरातीमध्ये काम केलं. या जाहिरातीनंतर त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक मणि रत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली. मात्र यावेळी त्याच्या पदरात अपयश आलं. विशेष म्हणजे मणि रत्नम यांच्या चित्रपटासाठी नाकारण्यात आलेल्या माधवनने पुढील करिअरमध्ये मणि रत्नम यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘गुरू’.

‘इस रात की सुबह नहीं’ हा माधवनचा पहिला चित्रपट होतो. त्यानंतर त्याने २००१ मध्ये ‘मिनाले’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रीमा सेनने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर माधवनची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी माधवनने अनेक मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘बनेगी अपनी बात’ , ‘तोल मोल के बोल’ आणि ‘घर जमाई’ या सारख्या मालिकांमध्ये काम केलं. मात्र कलाविश्वामध्ये पदार्पण करणाऱ्या माधवनला या क्षेत्रात येण्याऐवजी लष्करात भरती व्हायचं होतं. त्या देशसेवा करायची होती. त्यामुळेच त्याने एक आर्मी ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र काही कारणास्तव त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. परंतु कलाविश्वात त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटविला.

दरम्यान, त्याच्या मिनाले या दाक्षिणात्य चित्रपटाचा ‘रहना है तेरे दिल में’ हा हिंदी रिमेक करण्यात आला. या चित्रपटामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत दिया मिर्जा, सैफ अली खान हेदेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्याने ‘रंग दे बसंती’, ‘३ इडियट्स’,’ तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटामध्ये काम केलं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranganathan madhavan birthday special story
First published on: 01-06-2019 at 09:59 IST