अभिनेत्री कंगना रणौतची बहीण  रंगोली चांडेल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाची पाठराखण करत असते. आपला निर्भीड आणि रोखठोक बोलण्यामुळे कंगना अनेक वेळा वादात अडकत असते. मात्र रंगोली कायम तिची बाजू सावरुन घेताना दिसते. इतकंच नाही तर कंगनाविरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येकाला ती सडेतोड शब्दांमध्ये उत्तरही देते. मात्र कंगनाप्रमाणेच स्पष्टवक्तेपणे मत मांडणाऱ्या रंगोलीच्या आयुष्यातील एक वेदनादायक प्रसंग तिने नुकताच ट्विटरच्या माध्यमातून सांगितला आहे.

रंगोली अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावली असून त्या प्रसंगी तिच्यासोबत नेमकं काय झालं होतं हे तिने सांगितलं आहे. रंगोलीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यासोबतच कंगनालादेखील काही जणांनी बेदम मारहाण केली होती. हे देखील तिने सांगितलं.

रंगोलीने ट्विटरवर महाविद्यालयीन जीवनातील एक फोटो शेअर केला असून हा फोटो काढल्यानंतर तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाल्याचं तिने सांगितलं. ‘हा फोटो काढल्यानंतर काही वेळानंतर एका मुलाने मला प्रपोज केलं होतं. मात्र मी त्याला नकार दिला, त्यानंतर त्याने एक लिटर अ‍ॅसिड माझ्या चेहऱ्यावर फेकलं. त्यावेळी माझ्यावर जवळपास ५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतकंच नाही तर माझ्या लहान बहिणीचीही छेड काढण्यात आली. तिला बेदम मारहाणही करण्यात आली होती…का….?’, असा प्रश्न रंगोलीने विचारला.

पुढे ती म्हणाली, ‘मुलींना आजही चांगली वागणूक देण्यात येत नाही. तेव्हा आता या क्रूरतेशी लढण्याची वेळ आली आहे. निदान आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे होणं गरजेचं आहे’.

रंगोलीने अ‍ॅसिड हल्ला झाल्यानंतर तिला कोणत्या वेदना झाल्या हेदेखील सांगितलं. ‘माझे अवयव माझ्या डोळ्यासमोर वितळत होते. ५४ शस्त्रक्रिया केल्यानंतरही माझा कान डॉक्टर नीट करु शकले नाहीत. मात्र त्या काळात माझे आई-वडील, कंगना हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते’.
दरम्यान, आजही अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसाठी फारशी तरतूद करण्यात आलेली नाही याविषयी तिने खंतही व्यक्त केली.