लग्नानंतर ती आली तेव्हा ‘मर्दानी’ होती आणि तिकीटबारीवरही तिच्या त्याच जोशात झुंज यशस्वी ठरली. त्यानंतर अदिराचा जन्म झाला आणि तिने पुन्हा विश्रांती घेतली. आता क्षणभर विश्रांतीचा काळ संपवून राणी मुखर्जी पुन्हा नव्याने कामाला लागली आहे. ‘हिचकी’ हा तिचा नवीन चित्रपट मार्चच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गेले काही दिवस शांत असलेली राणी पुन्हा बोलती झाली आहे. विवाहानंतर अभिनेत्रीचे पुनरागमन आणि तिला पुन्हा पहिल्यासारखे चित्रपट मिळणे ही गोष्ट आधीइतकी सहजसोपी राहत नाही. मात्र अर्थातच आदित्य चोप्रासारखा सतत कामासाठी प्रोत्साहन देणारा नवरा असल्यानेच त्या कोशातून बाहेर पडून सेटवर येणे शक्य झाले असल्याचे राणी सांगते. स्त्रीवादावर सध्या जोरदार चर्चा रंगताहेत. पण केवळ चर्चेने बदल घडत नाहीत, ते तुमच्या कृतीतूनच घडतात, असे सांगणारी राणी आपण करिअरच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही वेगळ्या भूमिकेत रमलो आहोत, हेही मान्य करते.

‘हिचकी’चे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा राणीची मुलगी अदिरा लहान होती. अजून तिला आईची सवय आहे. आणि मी जर पुन्हा चित्रपटात काम सुरू केलं तर दिवसातला बराच वेळ मी तिच्यासोबत नसणार हा विचार खरं म्हणजे मला काम करू देत नव्हता. मात्र अदिराला याची हळूहळू सवय होईल, हा विश्वास देत पुन्हा सेटवर जाण्याचं प्रोत्साहन आपल्याला आदित्य चोप्राकडूनच मिळालं, असं ती सांगते. माझे चित्रपट, माझे चाहते हे माझं आयुष्य होतं. लग्न झाल्यानंतर ते सगळं मागे सोडण्याची गरज नाही. त्या गोष्टींनाही प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतर आता पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणं सुरू केल्याचं ती सांगते. चित्रीकरणामुळे मी अदिराबरोबर नसणार आहे, पण जसजशी ती मोठी होत जाईल, तिला आपले आईवडील दोघेही काम करतात याची जाणीव होईल आणि तिला त्याचा अभिमानच वाटेल, असं राणी म्हणते.

कारकीर्दीच्या ऐन भरात असताना राणी मुखर्जीने ‘यशराज प्रॉडक्शन’चा सर्वेसर्वा असलेल्या आदित्य चोप्राशी विवाहाचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या होत्या. कायम बडबड करणारी, उत्साही राणी शांत, अबोल आदित्य चोप्राशी कशी विवाहबद्ध झाली, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावत आला आहे. मात्र खासगीपणा जपणारा आदित्यचा स्वभावच आपल्याला कमालीचा आवडला असं राणी सांगते. कामाप्रति त्याची निष्ठा आहे, त्याचा उत्साह, त्याची झोकून देऊन काम करण्याची पद्धत याच गोष्टी भावल्या. त्यामुळेच त्याच्या प्रेमात पडल्याची कबुली देणारी राणी प्रेमाने का होईना, दररोज आपण त्याला ऊठसूट नावं ठेवत असतो, हेही हसत सांगते. आमच्याकडे फार गोड गोड बोललं जात नाही. उलट नावं ठेवत कामं सुरू असली म्हणजे सगळं चांगलं, प्रेमाने आणि आलबेल सुरू आहे, अशी भावना असते. आणि घरातील बारीकसारीक गोष्टींपासून ते चित्रपटापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यालाच नावं ठेवत असते, त्याच्या नावाने सतत माझी बडबड सुरू असते, असं ती म्हणते. ‘हिचकी’ या तिच्या आगामी चित्रपटातही ती नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला असून खुद्द अमिताभ बच्चन यांनीही राणीची तारीफ केली आहे. आता सध्या तरी राणीने ‘हिचकी’वर लक्ष कें द्रित केले असून यापुढे सातत्याने चित्रपटांमध्ये कार्यरत राहण्याचा मानसही तिने व्यक्त केला.