निर्मिती आणि दिग्दर्शकीय क्षेत्रात प्रत्येकवेळी काही तरी हटके करणारे रवी जाधव मराठी सिनेसृष्टीत आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहेत. सिनेमाचे पोस्टर असो वा चित्रपट प्रदर्शनापूर्वीची प्रसिद्धी असो, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या या क्रिएटिव्हिटीची झलक आपल्याला पाहायला मिळते. त्यांची हीच क्रिएटिव्हिटी आपल्याला ‘& जरा हटके’ या आगामी सिनेमाच्या पोस्टरमधून पाहायला मिळते. इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला आणि रवी जाधव या दोघांची निर्मिती असलेला सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘& जरा हटके’ या सिनेमाच्या पोस्टरवरील ‘&’ या इंग्रजी मुळाक्षराच्या ग्राफिटींना सोशल नेटवर्किंग साईटवर मोठी पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या नावामध्ये केलेल्या अशाप्रकारच्या कलाकृतीला प्रेक्षकांकडून देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी मराठीत असा प्रथमच प्रयत्न करण्यात आला असून, प्रेम करावे पण जरा हटके या उपशीर्षकातून बरेच काही सांगू इच्छिणारा हा ‘&’ सोशल साईटवर लोकांचे हटके मनोरंजन करताना दिसत आहे.
मिताली जोशी लिखित या सिनेमात आपल्याला मराठी आणि बंगाली संस्कृतीचा संगम अनुभवता येणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांची मुलं कसं स्वीकारतात याच चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. ‘&’ हे मुळाक्षरचं मुळात दोन भिन्न गोष्टींना जोडणारं असून नात्यांना पूर्णत्व देणार असल्यामुळे चित्रपटातील या मुळाक्षराला अधिक महत्व देण्यात आलंय. बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहे. इंद्रनील सोबतच मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत. नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2016 रोजी प्रकाशित
‘&’ ची ‘जरा हटके’ रूपं
'&' या इंग्रजी मुळाक्षराच्या ग्राफिटींना सोशल नेटवर्किंग साईटवर मोठी पसंती मिळत आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 28-06-2016 at 11:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi jadhavs upcoming movie jara hatkes creative posters