मराठीतील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लय भारी’ चित्रपट येत्या शुक्रवारी ११ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांमुळे मराठी सिनेरसिकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट तुम्ही का पाहाल याची कारणे..
१. रितेश देशमुख- बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेला मराठमोळा रितेश देशमुख ‘लय भारी’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याने यापूर्वी ‘बालक पालक’ आणि ‘यलो’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली होती. मात्र, त्यावरचं न थांबता रितेश मराठी चित्रपटात काम करताना यात दिसेल. बॉलीवूडमध्ये हास्यविनोदी भूमिकांमध्ये विशेष छाप पाडणारा रितेश सध्या आपल्या भूमिकांमध्ये विविधता आणताना दिसत आहे. नुकताचं प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ या हिंदी चित्रपटामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता आणि आता तो पहिल्यांदाच लय भारीतून अॅक्शनपॅक अवतारात दिसणार आहे.
२. सलमान खान- अनेक मराठी कलाकार बॉलीवूडच्या वाटेने जात आहेत. मात्र, आता बॉलीवूडही मराठीकडे वळताना दिसतयं. बॉ़लीवूडचा दबंग सलमान खान पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत यातून दिसेल. विशेष म्हणजे सलमानने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी या चित्रपटात काम केले आहे.
३. निशिकांत कामत- मराठीत ‘डोंबिवली फास्ट’ आणि हिंदीत ‘ये है मुंबई मेरी जान’ सारखा हिट चित्रपट देणा-या निशिकांत कामत याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे साहजिकचं सर्वांच्या अपेक्षाही त्याच्याकडून वाढल्या आहेत.
४. अजय-अतुल- आपल्या संगीताच्या तालावर अख्या बॉलीवूडला ताल धरायला लावणा-या अजय-अतुल या जोडीने ‘लय भारी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली ‘माऊली माऊली’ आणि ‘आला होळीचा सण लय भारी’ या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
५. पंढरीची वारी- चित्रपटात दाखविण्यात आलेली पंढरीच्या वारीची दृश्ये ही ख-या वारीतून चित्रीत करण्यात आलेली आहेत. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर हा प्रवास पायी करणा-या वारक-यांचा प्रवास यात दाखविण्यात आला आहे.
६. अॅक्शनपॅक आणि बिग बजेट- मराठीतला हा पहिला अॅक्शनपॅक आणि बिग बजेट चित्रपट आहे. यात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, नृत्यदिग्दर्शन, छायाचित्रण हे बॉलीवूडच्या तोडीचे असल्यामुळे हा मराठीतला पहिला बिग बजेट चित्रपट बनला आहे. यात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटाच्या तोडीची अॅक्शनदृश्ये चित्रीत करण्यात आली असून,. बॉलीवूडमध्ये साहसदृश्यांसाठी प्रसिद्ध असणा-या कौशल-मोजसने ‘लय भारी’तील साहसदृश्यांचे दिग्दर्शन केले आहे.
७. गणेश आचार्य- बॉलीवूडमध्ये नृत्य दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणेश आचार्यने ‘लय भारी’तील नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reasons why u will watch why u will watch lai bhaari movie
First published on: 09-07-2014 at 01:05 IST