रेश्मा राईकवार

रिमेकपटांच्या शर्यतीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हिंदीपेक्षाही अंमळ सरस आहे. त्यामुळे मूळ फ्रेंच चित्रपट ‘स्लीपलेस नाइट’चा अभिनेते-दिग्दर्शक कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेला तमिळ रिमेक २०१५ मध्ये ‘थोंगा वनम’ नावाने प्रदर्शित झाला होता. आता त्याचा हिंदी अवतार ‘ब्लडी डॅडी’ या नावाने ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे. देमारपटाला साजेसे कथानक आणि त्याला बाप-लेकाच्या भावनिक नात्याचा किंचितसा पदर असलेला हा चित्रपट अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

ओटीटी वाहिन्यांचा पसाराच सध्या इतका वाढला आहे त्यातही ‘जिओ सिनेमा’, ‘झी ५’ सारख्या ओटीटी वाहिन्यांनी जो काही चित्रपट आणि वेबमालिकांच्या निर्मितीचा धडाका लावला आहे की एरव्ही रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे अली अब्बास जफरसारख्या दिग्दर्शकांनी वेबपटांच्या बाबतीत तरी कामाचा उरक एवढाच मर्यादित अर्थ घेतला आहे की काय शंका येते. त्यातही मुळात रिमेक आहे म्हटल्यावर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी अवस्था आहे. अमली पदार्थाची तस्करी करणारे आणि ती करणाऱ्यांना उघडं पाडणारे यांच्यातला संघर्ष असं फार तर एका वाक्यात कथानक सांगता येईल. पण तेवढं पुरेसं नाही, कारण त्या अर्थाने तो गुंडटोळय़ांमधली मारामारी दाखवत नाही. थोडी हुशारी-थोडी फसवणूक असं सगळं मिश्रण त्यात आहे.

दिल्लीत भल्या सकाळी कोकेन घेऊन जाणाऱ्यांना ठोकून त्यांच्याकडून माल ताब्यात घेणारा पोलीस अधिकारी सुमेर याच्याभोवती संपूर्ण कथा फिरते. सुमेरचा घटस्फोट झाला आहे, पण मुलगा अथर्वशी असलेलं त्याचं नातं तितकंच घट्ट आहे. कामाच्या विचित्र वेळा आणि सतत बाहेर अडकलेल्या आपल्या वडिलांकडे आपल्यासाठी वेळ नाही, ते बेजबाबदार आहेत या भावनेतून त्रासलेला अथर्व आणि त्याच्याशी असलेलं आपलं नातं सावरू पाहणारा सुमेर हे दोघेही या कोकेन प्रकरणामुळे एका विचित्र परिस्थितीत अडकतात. अथर्वची सुटका करण्यासाठी सुमेरला हस्तगत केलेला कोकेनचा माल पुन्हा एकदा त्याच्या मूळ मालकापर्यंत (सिकंदर) पोहोचवायचा आहे. मग यात सुमेर, सिकंदर, सिकंदरची माणसं, सुमेरचे सहकारी अधिकारी असा सगळा गोतावळा वाढत जातो. यात कोण खरा-कोण खोटा हे शोधत शह-काटशहाच्या खेळाचं वेगवान कथानक पुढे सरकत राहतं. ‘ब्लडी डॅडी’ हा पूर्णपणे एका ठरीव साच्यातील कथानक आणि मांडणी असलेला चित्रपट आहे. मुलगा हेच सुमेरचं सर्वस्व आहे, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी एकेकको चुन चुन के मारुंगा.. वाला खेळ खेळण्याच्या तयारीनिशी तो सिकंदरच्या गुहेत शिरतो. आता मुळात सुमेर वाईट आहे की त्याचे सहकारी आणि कोण कोणाला नेमकी मात देत आहे हेही कुठे गुप्त न ठेवता चित्रपटातून वेगाने उलगडत जातं. त्यामुळे उत्कंठा वाटणं किंवा किमान त्यातील भावनिक नाटय़ात गुंतून जाणं हा प्रकारच प्रेक्षकांच्या मनात उमटत नाही.

अली अब्बास जफर हे काही नवोदित दिग्दर्शकाचं  नाव नाही. ‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’ सारखे चित्रपट देणारा हा दिग्दर्शक अ‍ॅक्शनपट त्याच सफाईने हाताळू शकतो. त्यामुळे ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटाच्या कथानकाला साजेशी वेगवान मांडणी आणि तांत्रिक सफाई त्यात आहे. अ‍ॅक्शनपट असल्याने गाण्यांचेही सोपस्कार नाहीत. बाकी सतत मारधाड सुरू असणाऱ्या या चित्रपटात हलकासा निवांतपणा मिळतो तो रोनित रॉयने साकारलेल्या ‘सिकंदर’च्या व्यक्तिरेखेमुळे.. सिकंदर पूर्णपणे वाईट नाही. तो ज्या धंद्यात आहे त्याची गणितं त्याला माहिती आहेत, तो प्रामाणिकपणे त्याच्या नेहमीच्या पद्धतीने धंदा करतो आहे.

अमली पदार्थाचा व्यवसाय बिनबोभाट चालण्यासाठी त्याने अमली पदार्थविरोधी विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनाच हाताशी ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून हाताशी धरून ठेवलं आहे. आणि या अधिकाऱ्याची त्या अधिकाऱ्याला खबर नाही इतक्या चलाख पद्धतीने त्याचा चाललेला कारभार एका सणकी बापाच्या प्रयत्नांमुळे कोसळतो आहे हे लक्षात येऊनही तो संयम राखत ज्या पद्धतीने सुमेरच्या मुलाशी, सहकाऱ्यांशी संवाद साधतो त्यातून काही गमतीचे क्षण हाती लागतात. बाकी डायना पेंटीचा वापर नावापुरता आहे, तर राजीव खंडेलवाल महत्त्वाच्या भूमिकेत असला तरी सगळा जोर सुमेरवर असल्याने शाहिद आणि शाहिदच संपूर्ण चित्रपटभर व्यापून राहतो. बरं अशा प्रकारच्या भूमिकेतून शाहिदला पाहण्याची प्रेक्षकांनाही सवय झाली आहे त्यामुळे त्यातही काही नावीन्य उरलेलं नाही. अली अब्बास जफरने आत्तापर्यंत त्याच्या तथाकथित व्यावसायिक मसाला चित्रपटातूनही काही ना काही वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मात्र रिमेकमुळे त्याचे हात बांधले गेलेत की काय असं वाटत राहतं. जसा आहे तसा वेगळय़ा भाषेत आणि वेगळय़ा कलाकारांबरोबर उतरवत देमारपट देण्यापलीकडे दिग्दर्शक म्हणून त्याचा काहीही प्रभाव जाणवत नाही. हलकंसंही हसू उमटू नये वा विचार करायला लागू नये इतका वेगवान देमारपट म्हणून ‘ब्लडी डॅडी’चा उल्लेख करता येईल.

ब्लडी डॅडी

दिग्दर्शक – अली अब्बास जफर

कलाकार – शाहिद कपूर, डायना पेंटी, राजीव खंडेलवाल, रोनित रॉय, संजय कपूर.