रवींद्र पाथरे

मराठी रंगभूमीवर मध्यमवर्गीयांची सुखदु:खं, त्यांच्या व्यथा-वेदना, त्यांचं विश्वच प्रामुख्यानं नेहमी बघायला, अनुभवायला मिळतं. याचं कारण मराठी रंगभूमीचे लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि प्रेक्षकही बहुश: मध्यमवर्गीयच आहेत.. असतात. त्यामुळे इतर वर्गीयांचं जिणं फारच क्वचित कधी मुख्य धारा रंगभूमीवर व्यक्त झालेलं पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर स्वप्नील जाधव लिखित-दिग्दर्शित ‘अस्तित्व’ हे तळागाळातील सफाई कामगाराच्या जीवनावरचं आणि त्याच्या कुटुंबाचं जगणं चित्रित करणारं नाटक मुख्य धारेत येणं ही तशी दुर्मीळच गोष्ट म्हणायला हवी. तेही जयंत पवार लिखित ‘अधांतर’सारखं गंभीर प्रकृतीचं नाटक केल्यावर विनोदी नाटक-चित्रपटांतून अत्यंत व्यग्र झालेल्या आणि त्यातच बरीच वर्षे रमणाऱ्या भरत जाधव यांनी ते करणं ही आणखीन एक खासीयत या नाटकाची आहे. शिवाय यानिमित्ताने भरत जाधव यांनी आपली इमेज बदलायचा प्रयत्न केला आहे, हेही विशेषत्वानं नोंदवायला हवं.

संतोष हसोळकर, त्यांची पत्नी आणि मयूर आणि दर्शना ही दोन मुलं यांच्याभोवती हे नाटक फिरतं. सफाई कामगार असलेले संतोष स्वकष्टाने मुंबईत बस्तान बसवून आपला घरसंसार उभा करतात. आपला गाव, आई-वडील, भावंडं, त्यांच्याप्रतीची आपली कर्तव्यं, आपले कुटुंबीय यांच्याभोवतीच त्यांचं अवघं विश्व विणलेलं आहे. त्यांची मुलं मयूर आणि दर्शना चांगले शिकलेसवरलेत. आता ते नोकरीधंद्याला लागतील आणि आपला भार कमी होईल, या भ्रमात असलेल्या संतोषना अचानक भलत्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. मयूरची नोकऱ्यांची धरसोड आणि दर्शनाची बेकारी त्यांना अस्वस्थ करत असते. आपण निवृत्त होण्यापूर्वी दर्शनाचं लग्न लावून दिलं की आपण कर्तव्यातून मोकळे अशी त्यांची समजूत असते. परंतु शिकल्यासवरलेल्या या मुलांच्या वेगळ्याच अपेक्षा असतात. त्यांचं विश्व संतोष आणि त्यांच्या पत्नीच्या कल्पनांशी मेळ खात नाही. त्यातून घरात सतत भांडणं, चिडचिड होत राहते. आई-बाप आपल्याला समजून घेत नाहीत अशी दोघांचीही तक्रार असते. तरीही संतोष दोघांना न दुखावता होता होईतो त्यांच्या कलानंच घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. दर्शना तिला वडलांनी आणलेली अनेक मुलांची स्थळं काही ना काही कारणांनी नाकारते. तिला आपण नोकरी करून आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचंय. रोजचं मुंबईचं घडयाळाच्या काटयावरचं जगणं तिला नको असतं. त्यातही चाळीतून बाहेर पडून स्वतंत्र ब्लॉकमध्ये आपलं घर असावं असं तिचं स्वप्न असतं. या शहराच्या नेहमीच्या घाईगडबडीच्या रहाटगाडग्यात तिला अडकायचं नसतं. तर मयूरला आपला स्वतंत्र ब्लॉक घ्यायचा असतो. त्याचं स्नेहाशी जमलेलं असतं. या म्युनिसिपालटीच्या घरातून वडील निवृत्त झाल्यावर आपल्याला बाहेर पडावं लागणार हे तो जाणून असतो. म्हणून तो डोंबिवलीत तशी एक जागाही बघतो. आणि ब्लॉकसाठीचे सुरुवातीचे दोन लाख रुपये भरण्यासाठी तो वडलांकडे पैसे मागतो. पण ते त्याला पैसे देत नाहीत. तेव्हा तो भावी सासऱ्यांकडून पैसे घेतो आणि ब्लॉक बुक करतो. पण पुढे तो बिल्डर फ्रॉड निघतो आणि त्याचे पैसे बुडतात. सासरे संतोषना येऊन हे वर्तमान सांगतात आणि आपण आपली मुलगी अशा मुलाला कदापि देणार नाही, हेही स्पष्ट करतात. संतोष त्यांचे पैसे चुकवतात आणि निवृत्तीनंतर सरळ गावाला जायला निघतात..

हेही वाचा >>> “माझ्या बॉयला मिळणारे पैसे…”, श्वेता शिंदेने सांगितली मराठी व हिंदीमधील मानधनातील तफावत; ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाली…

एका दलित कुटुंबाची मुंबईत होणारी सर्व प्रकारची कोंडी हा या नाटकाचा मध्यवर्ती विषय. लेखक-दिग्दर्शक स्वप्नील जाधव यांनी तो त्यातल्या छोटया छोटया तपशिलांसह नाटकात भरीवपणे मांडला आहे. सफाई कामगारांचं चाळीतलं जिणं त्यांनी विश्वासार्ह पद्धतीनं यात चित्रित केलं आहे. त्यांची सुख-दु:खं, व्यथा-वेदना, त्यांच्या अनुभव आणि संस्कारांतून निर्माण झालेल्या मूल्यजाणिवा यांचं दर्शन त्यातून होतं. नवीन पिढीची मोठी स्वप्नं, त्यापायी त्यांचं वास्तवाचं सुटलेलं भान, जुन्या पिढीने स्वानुभवांतून आपली सीमित केलेली स्वप्नं, नव्या पिढीशी जुळवून घेताना त्यांची होणारी फरपट व दमछाक आणि दोन पिढय़ांतील संघर्षांत ढवळून निघणारं अवघ्या कुटुंबाचं जगणं- असा व्यापक पट या नाटकात आहे. लेखक-दिग्दर्शकानं अत्यंत प्रभावीरीत्या त्याची मांडणी केली आहे. मोजकीच पात्रं, त्यांचे परस्पर भावबंध, त्यांच्या व्यथा-कथा, त्यांतून घडणारी त्यांची शोकांतिका असं या नाटकाचं स्वरूप आहे. ठाशीव पात्रं, त्यांच्यातले ताणेबाणे, त्यातून होणारी प्रत्येकाचीच कुचंबणा, कोंडमारा आणि परिस्थितीनं मारलेली पाचर यांचं लख्खं चित्र या नाटकात उभं राहतं. फक्त एक गोष्ट मात्र खटकते. ती ही की, संतोष यांच्या पत्नीची (आणि शेजारी कांबळेंची) भाषा गावाकडची आहे. पण तीही पूर्णत: तिथली बोली नाहीए. मधे मधे शहरी शब्दांची सरमिसळ त्यात आहे. बाकी सगळ्यांची भाषा मराठी आहे. अगदी संतोषचीदेखील. त्यांचे जगण्याचे संदर्भ मात्र अस्सल आहेत. सफाई कामगाराचं जगणं, त्यांच्या व्यथा-वेदना संतोषच्या जगण्या-वागण्यातून स्पष्ट होतात. त्यांना बायकोची तोलामोलाची साथ मिळते खरी; मात्र मुलांचं धडपणे बस्तान बसत नाहीए याचं दु:ख दोघांनाही आहे. त्यातून त्यांचं रागावणं, चिडचिड योग्यच म्हणायला हवी. पण ती मुलांपर्यंत पोहोचत नाही. शेवटी सगळीकडून हार पत्करून संतोष निवृत्तीपश्चात आपल्या गावी जायला निघतात.. ही त्यांचीच नव्हे, तर नव्या पिढीपुढे या शहरानं काय वाढून ठेवलं आहे याचीही शोकात्म गोष्ट आहे. लेखक-दिग्दर्शकाने प्रसंगांतून चढत जाणारा संघर्ष यथास्थित हाताळला आहे. तरीही का कुणास ठाऊक, कधी कधी त्यातली आतडयाच्या गुंतणुकीची कमी जाणवते.

हेही वाचा >>> नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन भारावले, सोशल मीडियावर पोस्ट करत आराध्याविषयी म्हणाले, “अभिमानास्पद क्षण…”

सचिन गावकरांनी चाळीचं नेपथ्य वास्तववादी उभारलं आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेतून नाटकातील प्रसंगांची तीव्रता वाढवली आहे. साई-पियुष यांचं नाटय़ांतर्गत संघर्षांला उठाव देणारं संगीत लक्षवेधी आहे. सचिन जाधव यांची रंगभूषा आणि चैत्राली डोंगरे यांची वेशभूषा पात्रांना त्यांचं खरंखुरं बाह्य़ व्यक्तिमत्त्व बहाल करते. 

भरत जाधव यांनी खूप काळानंतर आपल्यातल्या अभिनेत्याला आव्हान देणारी भूमिका यात साकारली आहे. संतोष यांचं वागणं-बोलणं, खांदे पाडून चालणं, व्यवहारातील पारदर्शकता, त्यांची परिस्थितीसमोरची हतबलता हे सारं त्यांनी यथास्थित व्यक्त केलं आहे. चिन्मयी सुमित यांनी त्यांच्या बायकोच्या भूमिकेत करारी, खंबीर, घरसंसारात रमलेली, पण काहीएक मूल्यं जपणारी स्त्री समजूतदारपणे उभी केली आहे. शेजारी कांबळेंच्या भूमिकेत जयराज नायर फिट्ट बसले आहेत. मयूरचं उथळ, चंचल व्यक्तिमत्त्व हार्दिक जाधव यांनी नेमकेपणानं वठवलं आहे. सलोनी सुर्वेंची दर्शना ही आजच्या पिढीची प्रातिनिधिक तरुणी आहे. श्याम घोरपडे स्नेहाच्या वडलांच्या भूमिकेचा आवश्यक तो आब राखून वागतात, वावरतात. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकुणात, मुंबईतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या- त्यातही दलित कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शोकात्म जगण्याचा आलेख हे नाटक चितारतं. मध्यमवर्गीय प्रेक्षकांनी आपल्या कोषातून बाहेर पडून तेही पाहायला, अनुभवायला हवं.