कोर्टरुम ड्रामा प्रकारात मोडणारा ‘मुल्क’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर या चित्रपटत मुख्य भूमिकेत झळकले होते. ३ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच २ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात त्यांनी ऋषी कपूर यांचीही एक आठवण शेअर केली आहे.
‘मुल्क’ चित्रपटात ऋषी कपूर यांनी मुराद अली मोहम्मद ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अनुभव सिन्हा यांनी या भूमिकेसाठी ऋषी कपूर यांना विचारणा केल्यावर काही क्षणाच्या आत ऋषी कपूर यांनी भूमिकेसाठी होकार दिला होता.
“माझ्या मुल्क चित्रपटात ऋषी कपूर यांनी काम करावं म्हणून मी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत मी कथा वाचत असताना केवळ १५ मिनीटांमध्ये त्यांनी काम करण्यास होकार दिला”, असं अनुभव सिन्हा म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “ऋषी कपूर कायम त्यांच्या शूटच्यापूर्वी स्क्रिप्ट वाचून दाखविण्यास सांगायचे. त्यावेळी सुद्धा मी स्क्रिप्ट समजावून सांगत असताना ते काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकत असतं. विशेष म्हणजे ते करत असलेल्या सहकार्यामुळे या केवळ २७ दिवसांमध्ये चित्रीकरण पार पडलं”. दरम्यान, ऋषी कपूर यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र आजही अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतात.