अभिनेता रितेश देशमुख त्याच्या सोशल नेटवर्किंगवरील अकाऊंटवरील पोस्टमुळे कायमच चर्चेत आहे. सध्या रितेश बागी ३ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या याच प्रमोशनदरम्यान रितेशची नवीन हेअरस्टाइल सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. रितेशला त्याच्या लूकवरुन सोशल नेटवर्किंगवर ट्रोलही होताना दिसत आहे. अनेकदा कलाकार ट्रोलर्सकडे दूर्लक्ष करतात. मात्र रितेशने ट्रोलर्सलाच ट्रोल केलं आहे. सध्या त्याचा एक रिप्लाय चांगलाच व्हायरल झाला आहे.

झालं असं की रितेशला त्याच्या हेअरस्टाइलमुळे एकाने “हा तर स्वस्तातला डीजे स्नेक वाटतोय” असा टोला लगावला. या ट्विटमध्ये या व्यक्तीने एकीकडे डीजे स्नेक आणि रितेशचा नव्या हेअरस्टाइलमधील फोटोही पोस्ट केला होता. या दोन्ही फोटोंमधील हेअरस्टाइलमध्ये बरेच साम्य दिसून येत आहे.

या ट्विटला रितेशने कोट करुन रिट्विट केलं आहे. “भावा मी स्वस्त नाहीय… नागपंचमीच्या दिवशी मला बूक कर मी तुझ्यासाठी मोफतमध्ये येईन,” असं उत्तर रितेशने या ट्रोलरला दिलं आहे. रितेशच्या उत्तरानंतर हे मूळ ट्विट त्या युझरने डिलीट केलं आहे.

रितेशच्या या उत्तरानंतर अनेकांनी त्याच्या हेअरस्टाइलसंदर्भातील मिम्स ट्विट केले आहेत.

यापूर्वी सोमवारी रितेशला त्याच्या नव्या लूकबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला असंच काहीसं मजेदार उत्तर दिलं होतं. “मी सध्या बेरोजगार आहे. माझ्याकडे सध्या काही काम नसल्याने मी असे केस कापले त्यानंतर दोन दिवसांनी मी केसांना कलर करण्याचा निर्णय घेतला. मी माझा पुढचा चित्रपट साईन करेपर्यंत निवांत असून घरीच असल्याने असे केस कापले आहेत,” असं उत्तर रितेशने दिलं होतं.