आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश हा त्याच्या मस्तीखोर अंदामुळे चाहत्यांची मने जिंकत असतो. नुकताच रितेशचा ‘हाऊसफुल ४’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच त्याचा ‘मर जावां’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रितेश देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते असणाऱ्या दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. विलासराव देशमुख यांची दोन्ही मुले आज आमदार आहेत. मात्र, रितेश बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. राजकारणात जाण्याची सुवर्णसंधी असताना रितेशने त्याकडे दुर्लक्ष करून चित्रपटांची वाट धरली. रितेश अभिनयाकडे का वळाला? हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आता खुद्द रितेशने अभिनयाकडे वळण्याचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : रितेश देशमुखने अक्षयकुमारची नक्कल केलेला व्हिडीओ पाहिलात का??
नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रितेशला राजकारणाऐवजी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यामागील कारण विचारले. त्यावर रितेशने ‘मी स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. पण मी इतरांच्या सल्ल्यांचा देखील मान ठेवतो. माझे काम चित्रपटात काम करण्याचे आहे आणि मी ते समर्पक वृत्तीने पूर्ण करतो. मी राजकारण माझ्या भावांकडे सोपावले आहे’ असे म्हणाला. त्यानंतर रितेशला तो कधी सत्तेकडे आकर्षीत होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. ‘मी माझ्या लहानपणापासून पॉवर काय आहे हे पाहिले आहे. त्यामुळे मला पॉवरचे इतके आकार्षण नाही’ असे रितेश म्हणाला आहे.
लवकरच रितेशचा ‘मर जावां’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात रितेशसह सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह आणि तारा सुतारिया हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे कथानक प्रेमकथेवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. तर निर्मिती भूषण कुमार,निखिल अडवाणी, दिव्या खोसला-कुमार, कृष्णा कुमार यांनी केली आहे.