बालपणीचा काळ सुखाचा… ही कैक लोकांच्या मनात गुंजत राहणारी गोष्ट. तुमचं, आमचं, प्रत्येकाचं बालपण हे वेगळं असलं तरी त्या काळच्या आठवणी निघाल्या की त्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच जोडून घेतात. लहानपणीची मैत्री, परीक्षेचा काळ, सुट्ट्यांमधली गंमत या सगळ्याचं प्रत्येकाच्या भावविश्वातलं कोलाज वेगळं असलं तरी त्यातला आनंद, दु:ख, हरवलेपण – निसटलेपण या भावनांची गाज सारखीच असते. या आठवणींच्या चंद्रमाधवी प्रदेशात पुन्हा फिरून येण्याची संधी रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने दिली आहे.
‘एप्रिल मे ९९’ हा रोहन मापुस्कर यांचा लेखक – दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. कास्टिंग डिरेक्टर म्हणून दीर्घकाळ चित्रपट क्षेत्राशी जोडलेले असलेल्या रोहन मापुस्कर यांनी पहिल्याच चित्रपटात त्यांच्या मनातली गोष्ट पडद्यावर रंगवली आहे.
कोकणात श्रीवर्धनसारख्या निसर्गरम्य गावात झालेलं चित्रीकरण, चित्रपटाच्या शीर्षकातच स्पष्ट केल्याप्रमाणे १९९९ च्या काळातली गोष्ट असल्याने समुद्राच्या साथीने, रानावनात भटकून काढलेलं बालपण, कधीतरी गावात कोणाच्या लग्नाच्या किंवा तत्सम महत्त्वाच्या समारंभांच्या निमित्ताने व्हिडीओ कॅसेटच्या मदतीने दाखवले जाणारे इंग्रजी चित्रपट वगैरे सोडले तर अवघं आयुष्य हे घरच्या-गावच्या जिवलगांबरोबर आणि मित्रमैत्रिणींमध्येच दंग असायचं. त्यामुळे नात्यांमधला सहजपणा, आपुलकी, रुसव्या-फुगव्यातही दडलेलं प्रेम, गावात पाहुणे म्हणून कोणी आलं तरी त्याला जीव लावणारं गाव या सगळ्यातला गोडवा ‘एप्रिल मे ९९’च्या कथेत लेखक रोहन मापुस्कर यांनी उतरवला आहे. जे लेखनात आहे तेच मांडणीतही असल्याने अतिशय साध्या-सरळ पद्धतीने जाणारा, कुठलीही भयंकर नाट्यमय वळणं न घेणारा असा हा सुंदर भावपट पडद्यावर उतरला आहे.
सिद्धेश, कृष्णा आणि प्रसाद या तीन मित्रांची ही गोष्ट आहे. तिघांनीही परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचं याचे मोठे मोठे बेत आखले आहेत. मात्र, प्रसादच्या वडिलांनी त्याला इंग्रजी शिकण्यासाठी सुट्टीचे दोन महिने मुंबईत पाठवायचा निर्णय घेतला आहे. प्रसादचं मुंबईला जाणं रद्द व्हावं यासाठी त्याच्या वडिलांना मनवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच जाई नावाची एक हुशार, चुणचुणीत मुलगी पाहुणी म्हणून गावात येते. जाई इंग्रजीही फर्डं बोलत असल्याने साहजिकच प्रसादची मुंबईवारी रद्द होते. या तिघांना इंग्रजी शिकवायची जबाबदारी जाईवर येते आणि त्या बदल्यात तिघांनाही जाईला गावात फिरवायची, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनमधली सुंदर ठिकाणं दाखवायचं काम दिलं जातं. लहानपणापासून प्रसाद, सिद्धेश आणि कृष्णा या तिघांची घट्ट मैत्री असल्याने त्यांच्यात आणखी कोणा चौथ्याला येऊ द्यायचं ही कल्पनाच त्यांना पचनी पडत नाही. त्यातही जाई मुलगी असल्याने ती नकोच… तिचं इंग्रजी शिकवणंही नकोच… या नकारातून सुरू झालेली या चौघांची गोष्ट खूप रंजकपणे पडद्यावर मांडली आहे.
या चित्रपटाला एक सरळसोट कथानक नाही. या तिघांची ओळख झाल्यानंतर हळूहळू त्यांना, त्यांच्या मैत्रीला समजून घेत त्यांच्याबरोबर जोडलं जाण्याची जाईची प्रक्रिया आणि जाई आल्यानंतर या तीन मित्रांमध्ये हळूहळू होत गेलेले बदल, मैत्रीवर पडलेला प्रभाव अशा दोन स्तरांवर गोष्ट घडते. मात्र, हे दोन तीरांवरचं जगणं न राहता दोन्ही प्रवाह सहज कथेच्या ओघात गुंफून घेत दिग्दर्शकाने मोठ्या कौशल्याने हा चित्रपट रंगवला आहे. या चित्रपटाची सगळ्यात भक्कम बाजू म्हणजे कथेतच असलेलं बालपणीच्या विश्वातलं स्मरणरंजन आणि ते पडद्यावर अकृत्रिम पद्धतीने रंगवणारे सगळे कलाकार. कास्टिंग डिरेक्टर म्हणून असलेल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग रोहन मापुस्कर यांनी या चित्रपटासाठी करून घेतला आहे. त्यामुळे चित्रपटातले महत्त्वाचे कलाकार म्हणजे प्रसादच्या भूमिकेतील श्रेयस थोरात, कृष्णा साकारणारा आर्यन मेघजी आणि सिद्धेशच्या भूमिकेतील मंथन काणेकर या तिघांची निवड चपखल ठरली आहे. या तिघांच्या धाकड मैत्रीला गोडगुलाबी नाजूक किनार मिळावी अशा निरागस, मनमोकळी जाई म्हणून साजिरी जोशी अगदी फिट बसली आहे. या चौघांमधली मैत्री पडद्यावर खूप सहजपणे निखरून आली आहे. त्याचं श्रेय या चौघांचा सहज अभिनय आणि पडद्यामागे त्यांना एकत्र आणत दिग्दर्शकाने घेतलेले खास प्रयत्न दोन्हीला आहे. याशिवाय, सिद्धेश-प्रसाद आणि कृष्णा या तिघांच्या आई-वडिलांच्या भूमिकेत, भटीण आत्या, पुष्पा मावशी अशा काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये परिचयाच्या कलाकारांपेक्षा वेगळ्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम या व्यक्तिरेखा आपल्याशा वाटण्यामध्ये झाला आहे. एकंदरीतच या कलाकारांमुळे आलेला ताजेपणा हेही या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा, हरिहरेश्वराच्या मंदिराच्या बाजूने असलेली कोसाची प्रदक्षिणा म्हणून ओळखला जाणारा प्रदक्षिणा मार्ग, गावातली घरं, मासळीबाजार, शाळा सगळ्या गोष्टींमधला देखणेपणा छायाचित्रणकार अपूर्वा शाळीग्राम यांच्या कॅमेऱ्याने अचूक टिपला आहे. निसर्गाच्या साक्षीने बहरत जाणारी या चौघांची मैत्री छायाचित्रणातून अधिक गहिरेपणाने आपल्यापर्यंत पोहोचते. चित्रपटात इन मिन तीन गाणी आहेत. रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेली तिन्ही गाणी छान जमून आली आहेत. त्यातही ‘मन जाई जाई’ हे गाणं चित्रपटात सुरेख वापरून घेतलं आहे. आपापल्या बालपणीच्या आठवणींचा म्हणून एक चंद्रमाधवीचा प्रदेश असतो. ‘एप्रिल मे ९९’मधल्या सिद्धेश, प्रसाद, कृष्णा आणि जाईची गोष्ट आपल्याला आपल्या त्या चंद्रमाधवीच्या प्रदेशात पुन्हा घेऊन जाते हेही तितकंच खरं.
एप्रिल मे ९९
दिग्दर्शक : रोहन मापुस्कर
कलाकार : श्रेयस थोरात, आर्यन मेघजी, मंथन कणेकर, साजिरी जोशी, आनंदा कारेकर, शुभांगी भुजबळ, सौमित्र पोटे, रविराज कांदे, पूजा सुरेश, सई ब्रह्मे, गौरी किरण, राजश्री पोतदार.