‘डेडपूल’ हा सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु अर्वाच्च संभाषण, आक्षेपार्ह दृश्य आणि मोठ्या प्रमाणावर इंटिमेट सीन्स असल्यामुळे डेडपूल फ्रेंचाईजी केवळ दोन चित्रपटानंतरच थांबवण्यात आली होती. परंतु मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे विशेष कार्यकारी अधिकारी केव्हिन फायगी यांनी डेडपूलच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी डेडपूलच्या आर-रेटेड चित्रपटांना हिंरवा कंदिल दाखवत थेट तीसऱ्या भागाची घोषणा केली आहे.

मार्व्हलं कंपनीचे हक्क सध्या डिस्ने कंपनीकडे आहेत. डिस्ने ही प्रामुख्याने लहान मुलं आणि कौटुंबिक मनोरंजनाला प्राधान्य देणारी कंपनी आहे. त्यामुळे डिस्नेच्या बॅनरखाली निर्माण होणारा कुठलाही चित्रपट कधीही आर-रेटेड किंवा अ‍ॅडल्ट प्रकारातील नसतो. त्यामुळेच डेडपूलवर देखील डिस्नेने बंदी घातली होती. परंतु प्रेक्षकांच्या आग्रहास्तव डिस्नेने आपला नियम अखेर मोडला आहे. त्यामुळे आता डेडपूलदेखील मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हरर्समध्ये इतर सुपरहिरोंसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे.

डेडपूल ही सुपरहिरो व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता रायन रेनॉल्ड याने देखील एका ट्विटच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. सध्या डेडपूलच्या तीसऱ्या भागाच्या पटकथेवर काम सुरु आहे. या चित्रपटात अॅव्हेंजर्समध्ये झळकलेले सुपरहिरो पाहायला मिळतीत अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अॅडल्ड कॉन्टेंटमुळे भारतात मात्र डेडपूलवरील बंदी अद्याप अधिकृतरित्या उठवलेली नाही.