अभिनेत्री सई ताम्हणकर आणि दिग्दर्शक संजय जाधव एकत्र आले की सुपरहिट चित्रपट पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दिग्दर्शक- अभिनेत्रीची ही जोडी सिनेसृष्टीतच नाही तर खेळाच्या मैदानावरही हिट ठरली आहे. सध्या सुरू असलेल्या कुस्ती दंगलमध्ये हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.

सोमवारी संजय जाधव यांच्यासह सई ताम्हणकरची संपूर्ण टीम बालेवाडीमध्ये कोल्हापूर मावळे विरुद्ध वीर मराठवाडा मॅचसाठी उपस्थित होती. सईच्या कोल्हापूर मावळे संघाला ४-२ अशा गुणांसह घवघवीत यश मिळालं. गेल्या काही दिवसांतील सामन्यांमध्ये सोमवारी झालेली कोल्हापूर मावळेची लढत सर्वाधिक चुरशीची होती. संघाच्या पहिल्या विजयानंतर सईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कोल्हापूर मावळे’सोबत विजयाचा आनंद साजरा केल्यानंतर सई म्हणाली, ‘आजपर्यंत कुस्ती दंगलमध्ये झालेल्या सर्व लढतींपैकी सोमवारची लढत ही सर्वाधिक चुरशीची आणि मनोरंजक होती. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या टीमच्या कुस्तीवीरांनी समोरच्या खेळाडूला मात देऊन यश मिळवलं. संजयदादा पहिल्यांदाच मॅच पाहायला आला आणि आम्ही मॅच जिंकलो. मी नेहमी म्हणते, दादा माझा लकीचार्म आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.’

सई मिश्किलपणे संजय जाधव यांच्याकडे पाहत पुढे म्हणाली, ‘आता मला जिंकवायला संजयदादाला प्रत्येक सामन्यासाठी यावंच लागणार.’