गेल्या काही दिवसांपासून ‘वजनदार’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या चित्रपटात वेगळ्याच लूकमध्ये आणखी भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दिवाळीचा सण आला की कुछ मिठा हो जाए म्हणत गोडाधोडावर मनसोक्त ताव मारला जातो. भरपूर फराळ केल्यानंतर शरीर वजनदार होतं आणि मग सुरू होते धावपळ. ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांचा वजनदार लुक असलेलं ‘वजनदार’ या चित्रपटाचं चॉकलेटयुक्त पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं. सई आणि प्रिया या दोघींचीही झलक या पोस्टवर पाहायला मिळते. विशेष म्हणजे या पोस्टरवरील ‘ज्या बारीक नसतात त्या जाडच असतात..’ ही टॅगलाइन तुमचे लक्ष वेधल्यावाचून राहणार नाही. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी हा पोस्टर फेसबुकवर पोस्ट केला असून त्यास ‘मी ढगळी पॅन्ट वर ओढत फिरतो त्यामुळे मला लहानपणीपासून हसलेल्या सर्वांना सप्रेम सादर. आत्मचरित्रात्मक की काय म्हणतात तसला माझा पिक्चर. वजनदार..’ असे कॅप्शन दिले आहे. याआधी ‘वजनदार’ चित्रपटाचे फेसबुक पेज आणि अॅनिमेटेड लोगो लाँच करण्यात आले होते.
विधि कासलीवाल यांच्या ‘लॅण्डमार्क फिल्म्स’तर्फे सादर होणाऱ्या आगामी ‘वजनदार’ या चित्रपटात दोन नायिका आणि एक नायक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या नायिकांच्या तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चेतन चिटणीस, समीर धर्माधिकारी हे कलाकारही चित्रपटात आहेत. हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2016 रोजी प्रकाशित
ज्या बारीक नसतात त्या जाडच असतात.. ‘वजनदार’चा पहिला पोस्टर प्रदर्शित
मी ढगळी पॅन्ट वर ओढत फिरतो त्यामुळे लहानपणीपासून माझ्यावर हसलेल्या सर्वांना सप्रेम सादर
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 29-09-2016 at 13:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhnkar and priya bapats vazandar movie poster launch