बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड म्हणजे तैमूर. अभिनेत्री करीना कपूर -खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक कायमच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. यात अनेकदा त्याचे आणि सैफचे एकत्र असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे या बाप-लेकाची बॉण्डिंग कशी आहे हे चाहत्यांच्या सहज लक्षात येतं. परंतु, सैफला तैमुरव्यतिरिक्त सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलंदेखील आहेत. त्यामुळे सैफच्या या तिन्ही मुलांमध्ये कायमच तुलना केली जाते. यामध्येच मला आम्हाला तीनही मुलं सारखीच आहेत, असं सैफने म्हटलं आहे.
“मी त्यांच्यासाठी कायमच आहे. मी माझ्या तीनही मुलांवर सारखंच प्रेम करतो. हे खरं आहे की मी तैमूरसोबत जास्त वेळ असते. मात्र, मी सारा आणि इब्राहिमसोबतही कायम आहे. माझ्या मनात माझ्या सगळ्या मुलांसाठी सारखीच जागा आहे. जर माझं किंवा साराचं काही बिनसलं तर मी तिच्याकडे दुर्लक्ष करुन तैमूरकडे जास्त लक्ष देतोय असं कधीच होत नाही. माझ्या तीनही मुलांची वय वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कायम त्यांच्या वयानुसार वागावं लागतं. मी फोनवर सारासोबत बराच वेळ बोलू शकतो. तसंच इब्राहिमसोबतही मात्र, तसं तैमूरसोबत होऊ शकत नाही”, असं सैफने सांगितलं.
दरम्यान, सैफ- करीनाच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. करीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. त्यामुळे या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खान आणि कपूर कुटुंबीय सज्ज असल्याचं दिसून येत आहेत.