करोनाचा प्रादुर्भाव राज्यात आणि देशात वाढतच चालला आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. आधी १४ एप्रिलपर्यंत असणारा हा लॉकडाउन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नका असंही आवाहन करण्यात आलं आहे. अगदी मोठ्या उद्योजकांपासून, सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सगळे घरातच आहेत. हातावरचे पोट असलेले लोकही हाल सहन करत आहेत. त्यांना सरकारने मदत देऊ केली आहे. त्यांच्यासाठी निवारा केंद्रंही उभी केली आहेत. अशा सगळ्या वातावरणात संगीतकार सलील कुलकर्णी यांनी सतत वेळ नाही, मी कामात आहे, मी परदेशवारी करणार आहे असे दावे करणाऱ्या माणसांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

काय आहे सलील कुलकर्णींची पोस्ट?

नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त……

माझ्या एक एक तासाची किंमत आहे असं उर्मट चेहऱ्याने सांगणारे ……

पुढच्या महिन्यात फोन करून पाहा…हा महिना तर अगदी ओव्हर पॅक आहे म्हणणारे……

पुढच्या दोन महिन्यात सहा देशांत फिरणार आहे असं मिरवणारे….

तुला बघुन घेतो मी ,तुझ्या गावात येऊन घरात घुसतो असा दम भरणारे….

मी फोन उचलत नाही हो…सतत meetings असतात ऑफिस मध्ये आमच्या.. असा दावा करणारे……

माझ्या एका हाकेवर दहा हजार लोक जमा होतील असं गरजणारे …

दर काही दिवसांनी ऑफिस ची टूर आहे सांगून बाहेरख्याली पणा करून फसवणारे…

सगळे थांबले…शांत….एका रांगेत..
तोंड झाकून…
अंतर राखून

नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त……

सलील कुलकर्णी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याकडे वेळ नाही, आपण खूप कामात आहोत, आपण सगळं काही साध्य करु शकतो असा दावा करणाऱ्या सगळ्यांनाच सलील कुलकर्णी यांनी आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. करोना नावाच्या एका व्हायरसने सगळ्यांचं आयुष्य कसं बदलून टाकलं आहे हे सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे. नियतीने एक कुस बदलली आणि काय घडलं ? ते आपण पाहतो आहोत. मोठमोठे दावे करणारे, गर्व करणारे, बिझी आहोत सांगणारे आज शांत बसले आहेत किंवा रांगेत उभे आहेत असं सलील कुलकर्णींनी सांगितलं आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.