‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘जान-ए-मन’ असो किंवा’ तिस मार खा’ चित्रपटातील ‘वल्लाह वल्लाह’ गाणे असूदे अक्षय कुमार आणि सलमान खान यांनी रुपेरी पडद्यावर एकत्र आल्यावर नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आता पुन्हा हे दोघे रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. आगामी ‘फग्ली’ या चित्रपटासाठी दोघांनी एक खास गाणे केले आहे. काही दिवसांपूर्वीच दबंग खान आणि खिलाडी कुमारने या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये दोन दिवस या गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटाद्वारे मुष्ठियोद्धा विजेंदर सिंग आणि अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाह चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. याव्यतिरीक्त कियारा अडवाणी, अर्फी लांबा आणि जिमी शेरगिल यांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ‘फग्ली’चे दिग्दर्शन कबीर सदानंद याचे असून, स्वतः अक्षय कुमार चित्रपटाची निर्मिती करत आहे.