देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वातावरण गंभीर झालेलं आहे. या करोनासदृश्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनाला बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने देखील आपला पाठिंबा दर्शवला आहे. “स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कृपया घरात बसा.” असं आवाहन त्याने देशवासीयांना केलं आहे.
काय म्हणाला सलमान खान?
सलमानने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लोकांना ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “सरकारने दिलेल्या सूचनांचे गांभिर्याने पालन करा. अफवा पसरवू नका. करोना विषाणूची लागण कोणालाही कुठेही होऊ शकते. अगदी बस, ट्रेन, मार्केट कुठेही करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे घरात बसा. मास्क वापरा. स्वच्छता राखा. घरात बसून स्वत:चा जीव वाचवा.” असं आवाहन सलमान खानने केले आहे.
देशभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर सलमान खानची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या दिल्या आहेत. सलमानच्या काही चाहत्यांनी तर त्याचे या व्हिडीओसाठी कौतुक देखील केले आहे.