सलमानचा पैलवानकीतून बाहेर पडण्याचा किस्सा वेदनादायी | Loksatta

सलमानचा पैलवानकीतून बाहेर पडण्याचा किस्सा वेदनादायी

त्याने तब्बल १८ ते २० किलो वजन कमी केले आहे.

Salman khan, losing weigh,sultan,सलमान खान
बॉलिवूड अभिनेता सलमान खान

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतो. ‘टायगर जिंदा है” या आगामी चित्रपटासोबतच सध्या तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ‘सुलतान’ चित्रपटातील कुस्तीपटूची भूमिका साकारल्यानंतर त्याने आगामी चित्रपटासाठी वजन कमी केल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या चित्रपटातील दमदार भूमिकेनंतर त्याने तब्बल १८ ते २० किलो वजन कमी केले आहे. एखाद्या चित्रपटासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कलाकाराने वजन कमी करणे फारच कठिण असल्याचे म्हटले आहे. झी पुरस्कार सोहळ्यामध्ये सलमानने वजन कमी करणे हे मेहनतीचे काम असल्याचे सांगितले.

सुलतान चित्रपटात हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिका साकारण्यासाठी त्याने अधिक मेहनत घेतली होती. ‘सुलतान’ चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना सलमान म्हणाला की, या चित्रपटासाठी मी वजन वाढविण्यावर मेहनत घेतली होती. या चित्रपटावेळी मी ९६ किलो वजन केले होते. त्यानंतर आता नव्या भूमिकेसाठी मी सज्ज झालो आहे. पण मला वजन कमी करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली आहे. आगामी चित्रपटासाठी मी १८ ते २० किलो वजन घटविले आहे. वजन वाढविण्याप्रमाणे वजन कमी करणे हे वेदनादायी होते.

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते. मनमिळाऊ, खोडकर वृत्ती असलेला हा अभिनेता नेहमीच चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी होतो. अभिनयासोबतच सलमानला सायकलस्वारीचीही आवड आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या राहत्या घराजवळील परिसरात सलमान अनेकदा सायकरस्वारीसाठी बाहेर पडताना दिसला आहे. काही दिवसांपूर्वीच पनवेल येथील फार्म हाऊसच्या परिसरात सलमान नुकताच सायकलस्वारीसाठी बाहेर आल्याचे पाहायला मिळाले होते. सलमानने परिधान केलेला एकंदर पोषाख हा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील त्याचा लूक असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सलमानने केलेली ही सायकलवारी वजन कमी करण्याचा एक भाग देखील असू शकते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2017 at 19:15 IST
Next Story
Badrinath Ki Dulhania box office collection : ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ कमाईत रंगला