एम एस धोनी,लस्ट स्टोरीज, कलंक अशा चित्रपटांमधून झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच आज चाहत्यांमध्ये तिची कमालीची लोकप्रियता पाहायला मिळते. मात्र ‘कियारा अडवाणी’ या नावाने नावारुपाला आलेल्या या अभिनेत्रीचं खरं नाव मात्र वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. खुद्द कियारानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे.
बॉलिवूड कलाकार अनेक वेळा करिअरची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नावामध्ये बदल करत असतात. आजवर अनेक कलाकारांनी आपल्या नावामध्ये बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता कियारानेदेखील तिचं नाव बदलल्याचं समोर आलं आहे. कियाराचं खरं नाव ‘आलिया’ असल्याचं तिने ‘फिट अप विथ स्टार’ या चॅट शोमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे कियाराने अभिनेता सलमान खानच्या सांगण्यावरुन नावात बदल केल्याचंही तिने यावेळी जाहीर केलं.
“कलाविश्वामध्ये माझ्यापूर्वीच आलिया भट्टचं पदार्पण झालं होतं. त्यामुळे जर मी बॉलिवूडमध्ये या नावाने पदार्पण केलं असतं तर दोन आलिया आज पाहायला मिळाल्या असत्या. एकाच नावाच्या दोन अभिनेत्री नसाव्यात असं मला प्रकर्षाने वाटत होतं. सलमानचंदेखील असंच काहीसं मत होतं. त्यामुळेच मी माझ्या नावात बदल करत ‘आलिया’ हे नाव सोडून ‘कियारा’ या नावाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला”, असं कियाराने या चॅट शोमध्ये सांगितलं.