बॉलीवूडच्या दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित सुलतान हा चित्रपट उद्या ईदच्या मुहुर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यशराज बॅनरअंतर्गत बनलेल्या या चित्रपटावर तब्बल ११५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान, हा चित्रपट पहिल्या पाच दिवसांत १५० कोटींच्यावर गल्ला कमवण्याची शक्यता चित्रपट समीक्षकांनी वर्तवली आहे.
समीक्षक अमुल मोहन यांनी बॉलीवूड लाइफला दिलेल्या माहितीनुसार, सलमानचे चित्रपट असेही त्याचे मागचे रेकॉर्ड मोडत चालले आहेत. त्यात सुलतान हा ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होत असल्याने पहिल्या दिवशी जवळपास ४० ते ४५ कोटींचा गल्ला कमवू शकतो. मात्र, गुरुवारी चित्रपटाच्या गल्ल्यावर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर शुक्रवारी नक्कीच चांगली कमाई होईल आणि नंतर शनिवार वगळता रविवारी सुट्टी असल्यामुळे बरेच प्रेक्षक चित्रपटगृहाकडे खेचले जातील. त्यामुळे जर बुधवार, शुक्रवार आणि रविवारचा विचार केला तर हा चित्रपट १५०-१६० कोटींचा गल्ला जमवू शकतो किंवा त्याहूनही जास्त कमाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सलमानच्या नावावरचं चित्रपट खपतात. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चांगली कमाई करेल याबाबत शंका नाही.
अमुल यांनी सुलतानच्या कमाईबाबत मोठे विधान केले असले तरी समीक्षक तरण आदर्श यांनी सुलतानबाबत खूप सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी कोणताही मोठा आकडा सांगण्याऐवजी सलमान + यशराज + ईद याहून चांगले काय असू शकते? असे म्हणत सलमानचा चित्रपट चांगलीच कमाई करेल असे म्हटलेय.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2016 रोजी प्रकाशित
सलमानच्या ‘सुलतान’ला मिळणार १५० कोटींची ओपनिंग!
सलमान + यशराज + ईद याहून चांगले काय असू शकते?
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 05-07-2016 at 13:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans sultan to get rs 150 crore opening trade experts begin predicting game