‘खुलता कळी खुलेना’ची हळुवार चाल असो; ‘चूकभूल द्यावी घ्यावी’चा खोडकरपणा असो; ‘काहे दिया परदेस’मधला रोमान्स असो; सगळ्या गाण्यांमध्ये जादू आहे हे नक्की! ही जादू आहे समीर सप्तीस्कर या तरुण संगीतकाराची!

मालिकेचं शीर्षक गीत हा प्रेक्षकांच्या खास आवडीचा विषय. अगदी आधीपासूनच. ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘बोक्या सातबंडे’, ‘गोटय़ा’ अशा अनेक जुन्या मालिकांची शीर्षकगीतं आजही त्यांच्या ओठांवर असतात. अगदी तालासुरात. प्रेक्षकांची ही अगदी जुनी सवय आजही तशीच आहे. किंबहुना शीर्षकगीतप्रेमींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत जातेय. यात विशेष उल्लेख करता येईल लहान मुलांचा. ही मुलं मालिकांबाबत इतकी वेडी नसतात, पण कोणत्याही मालिकेचं शीर्षकगीत त्यांचं अगदी तोंडपाठ. या सगळ्याचं श्रेय जातं ते त्या त्या मालिकांचं शीर्षकगीत तयार करणाऱ्याला. शीर्षकगीतात शब्द महत्त्वाचे असतातच पण त्याचबरोबर चाल प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत असते. दर्जेदार शीर्षकगीतं तयार करणाऱ्या संगीतकारांमध्ये सध्या समीर सप्तीस्कर आघाडीवर आहे. या तरुण संगीतकाराच्या नावे सध्या तीन लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीतं आहेत. ‘खुलता कळी खुलेना’, ‘काहे दिया परदेस’ आणि ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या तीन मालिकांची शीर्षकगीतं समीरने संगीतबद्ध केली आहेत. शिवाय आगामी ‘दिल दोस्ती दोबारा’ या धमाकेदार मालिकेचंही शीर्षकगीत तोच करतोय.

समीरला संगीताची आवड आधीपासूनच होती. पण, नंतर या  आवडीचं करिअरमध्ये रूपांतरित करावं असं त्याला जाणवू लागलं. पण याचा गंभीरपणे विचार करायचा असेल तर रंगभूमीवर काम करायला हवं ही त्याला झालेली आणखी एक जाणीव. ‘संगीत क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवल्यानंतर मला नाटकातील संगीत विभागाचा अनुभव घ्यायला हवा, असं वाटू लागलं. त्या वेळी गीतकार अभिषेक खणकर मला भेटला. त्या वेळी त्याने मला वन अ‍ॅक्टसाठी संगीत देणार का? असं विचारलं. मी अर्थातच हो म्हटलं. ‘अनन्या’ या एकांकिकेसाठी आम्ही काम केलं. तिथेच माझी आणि सचिन पाठकची ओळख झाली. त्यातून आमचा ‘से बॅण्ड’ तयार झाला. त्यानंतर एक अल्बमही झाला. हा अल्बम तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता आणि या अल्बममुळेच मला ‘दुनियादारी’ या सिनेमासाठी काम करण्याची संधी मिळाली’, समीर त्याच्या करिअरचा सुरुवातीचा प्रवास सांगतो.

‘दुनियादारी’ या सिनेमातली सगळीच गाणी लोकप्रिय झाली. या सिनेमात वेगवेगळ्या संगीतकारांनी गाणी संगीतबद्ध केल्यामुळे त्या गाण्यांची मजा आणखी वेगळी होती. यातलं ‘जिंदगी’ हे गाणं तर कॉलेज कट्टय़ांवर, नाक्यांवर, कॅम्पसमध्ये अतिशय गाजलं. हे गाणं होतं समीरचं. अनेक कलाकारांनी मिळून ते गायलं होतं, हे या गाण्याचं वैशिष्टय़. हे गाणं तरुणांचं लक्ष वेधून घेणारं, त्यांच्या आयुष्याच्या जवळ जाणारं ठरलं. त्यानंतर समीरने ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या सिनेमासाठी काम केलं. या सिनेमानंतर मात्र समीरला त्याच्या करिअरमध्ये काहीसा वेगळा अनुभव आला. तो त्याबद्दल सांगतो, ‘दुनियादारी आणि प्यारवाली लव्हस्टोरी हे दोन सिनेमे झाल्यानंतर जवळपास तीन र्वष मी करत असलेलं काम लोकांसमोर येतच नव्हतं. म्हणजे एखाद्या सिनेमाला संगीत दिलं असेल तर तो प्रदर्शित होत नव्हता. ‘घंटा’, ‘झिपऱ्या’, ‘ढिंचॅक एंटरप्राइजेस’ हे त्यापैकी काही सिनेमे. हे त्या तीन वर्षांत प्रदर्शित झालेच नाहीत. त्या दरम्यान माझ्याकडे साधारण एकाच पठडीच्या गाण्यांच्या ऑफर्स यायच्या. करिअरमधला हा काळ माझ्यासाठी खूप वेगळा होता. पण समोर येत असलेल्या गोष्टी शांतपणे हाताळल्या.’ समीरच्या करिअरची सुरुवात एका लोकप्रिय सिनेमाने झाली. नंतर आणखी एका दमदार सिनेमात त्याचा सहभाग होता. पण त्यानंतर त्याच्या करिअरची घडी काहीशी विस्कटली. पण, ती घडी पूर्ववत झाली ती शीर्षकगीतांमुळे. या काळात कोणत्याही प्रकारे खचून न जाता समीरने त्याच्या कामात सातत्य दाखवलं आणि त्याचे परिणाम आता सर्व प्रेक्षकांपर्यंत काही शीर्षकगीतांमुळे पोहोचले आहेत.

शीर्षकगीताच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली याबद्दल समीर सांगतो, ‘अभिजीत गायकवाड हा माझा मित्र एकदा मला भेटला. म्हणाला की, मी झी मराठीसाठी एक गाणं लिहिलंय. त्याला जरा चाल लावून दे. मी ते चालीत बसवलं. चॅनललाही ऐकवलं. चॅनलच्या संपूर्ण टीमला ते आवडलं. ते गाणं रेकॉर्डही झालं. प्रेक्षकांनासुद्धा आवडलं. मालिका सुरू झाल्यानंतर फार कमी दिवसांत ते शीर्षकगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. ते शीर्षकगीत होतं ‘काहे दिया परदेस’ या मालिकेचं. या संपूर्ण घटनाक्रमावर माझा विश्वासच बसत नव्हता. अगदी सहज माझा मित्र माझ्याकडे येतो काय, मीही तितक्याच सहजपणे त्याला चाल लावून देतो काय, आणि त्याचं रुपांतर अशा शीर्षकगीतात होतं काय, असं सगळं होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून मी भारावून गेलो होतो.’ अशा प्रकारे समीरच्या करिअरमधला शीर्षकगीतांचा सिलसिला सुरू झाला. यानंतर ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या दोन्ही मालिकांच्या शीर्षकगीतांनी प्रेक्षकांवर जादू केली आहे.

‘खुलता कळी खुलेना’चं शीर्षकगीत श्रेया घोषाल या हिंदीतल्या आघाडीच्या गायिकेने गायलं आहे. ते शीर्षकगीत आवडण्याचं हे एक खास कारण आहे. पण, श्रेया घोषाल आणि ‘खुलता..’चं शीर्षकगीत याबद्दलची एक आठवण समीर सांगतो, ‘खुलता कळी खुलेना’ची मी फक्त एक टय़ून तयार केली आणि ती चॅनलला ऐकवली. ती टय़ूनही त्यांना आवडली. पण ते गाणं श्रेया घोषालकडून गाऊन घ्यायचं, अशी माझी कल्पना होती. त्यासाठी श्रेयाच हवी असं मी चॅनलला सांगितलं. १८ जुलैला मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित होणार होता. चॅनलने मला १५ तारखेपर्यंत वेळ दिला होता. त्या दरम्यान मी श्रेयाशी संपर्क करायचा प्रयत्न केला होता. पण, तिच्याकडून मेसेज आणि फोनला प्रतिसाद मिळत नव्हता. त्या वेळी तिचं ‘पद्मावती’ या सिनेमाचं काम सुरू होतं. त्यामुळे ती बिझी होती. १३ जुलैला तिचा स्वत:हून मेसेज आला. ती ते शीर्षकगीत गाण्यासाठी तयारही झाली. तिचा स्वत:हून मेसेज येणं मला आवडलं. आम्ही लगेच १४ जुलैला कामाला सुरुवात केली आणि १६ जुलैला ते चॅनलकडे पाठवलंसुद्धा. आणि १८ जुलैला ते प्रेक्षकांसमोरही आलंही. या मालिकेचं शीर्षकगीत एकदम कट टू कट झालं. याही शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती मिळाली.’

सिनेसृष्टीत काम करीत असणाऱ्या प्रत्येकालाच त्याचं नाव, काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं, सिनेवर्तुळात त्याच्या कामाची दखल घ्यावी असं वाटत असतं. समीरलाही तसंच वाटत होतं. दोन लोकप्रिय सिनेमांसाठी काम करूनही त्याला त्याच्या नावाची ओळख हवी होती. त्याच्या कामाची पावती मिळणं त्याच्यासाठी महत्त्वाची होतं. अखेर त्याला शीर्षकगीतांमुळेच ओळख मिळाली, असं तो बिनधास्त कबूल करतो. ‘दिलीप प्रभावळकर यांना ‘खुलता कळी खुलेना’चं शीर्षकगीत खूप आवडलं होतं. म्हणून ‘चूकभूल..’ या मालिकेच्या शीर्षकगीताच्या रेकॉर्डिगला दिलीप प्रभावळकर स्वत: आले होते, अशी माहिती समीर देतो. सुरेश वाडकर यांनी हे शीर्षकगीत गायलंय. यामागचं कारणही समीर सांगतो, ‘सुरेश वाडकर यांच्या आवाजाची जादू काही औरच आहे. त्यांची गाणी मी आधीपासून ऐकत आलोय. ‘सत्या’ सिनेमातलं त्यांचं ‘सपनें में मिलती है’ हे गाणं मला खूप आवडतं. त्या गाण्यात त्यांनी जी धमाल केली आहे त्याला तोड नाही. त्यातल्या खोडकर जागा घेत त्यांनी त्या गाण्यात जिवंतपणा आणलाय. ‘चूकभूल..’च्या शीर्षकगीतातही काहीसा खोडकरपणा होता. आणि म्हणूनच मी सुरेशजींना या गाण्यासाठी विचारलं. अर्थातच मला त्यांना या गाण्यासाठी अजिबात काही सांगावं लागलं नाही. गाण्यात ज्या काही गमतीजमती ऐकायला येतात त्या त्यांनीच केल्या आहेत. मला जे नेमकं हवं होतं ते सगळं या गाण्यात जमून आलं आहे.’ सुरेश वाडकर यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी मालिकेसाठी गायले आहेत.

एकाच प्रकारच्या भूमिका केल्यावर कलाकाराला तशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर्स येणं स्वाभाविक असतं. अशा वेळी कलाकाराला विशिष्ट भूमिकेने ओळखणं कधी कधी असुरक्षितही वाटू शकतं. तसंच संगीतकाराचंही होऊ शकतं. सतत शीर्षकगीतं केल्यानंतर त्याचीच जास्त ऑफर येईल याबाबत असुरक्षित वाटतं का, असं विचारल्यावर समीर स्पष्ट सांगतो, ‘अशी असुरक्षितता अजिबात वाटत नाही. कारण मालिकेचं शीर्षकगीत करणं हे जास्त कठीण असतं. एका मिनिटांत त्यातून खूप काही सांगायचं असतं. कमी वेळात सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. हे आव्हानात्मक आहे. तसंच सिनेमातल्या गाण्यांप्रमाणेच प्रेक्षकांना शीर्षकगीतंही जवळची वाटतात. ठरावीक वेळी ठरावीक शीर्षकगीत ऐकू येण्याची त्यांना सवय झालेली असते. अनेक जण या शीर्षकगीतांच्या िरगटोन्सही म्हणूनही वापर करतात. अनेकदा गाणं छान बनलेलं असतं पण त्याचा व्हिडीओ तितका चांगला नसतो. अशा वेळी ते शीर्षकगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. इतकी आव्हानं, प्रेक्षकांचं प्रेम असल्यामुळे मला यात अजिबात असुरक्षित वाटत नाही. उलट यात मला विविध प्रयोग करायला मिळतात. तसंच आजवर मी केलेल्या कामाला पसंती मिळाली आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे असं मला वाटतं.’

समीरने केलेल्या शीर्षकगीतांपैकी त्याच्या आवडीचं गाणं आहे, ‘खुलता कळी खुलेना’. आधी सगळी तरुणांची गाणी करणारा संगीतकार अशी त्याची ओळख होती. पण, या गाण्याने त्याला एक परिपक्व संगीतकार म्हणून ओळख मिळवून दिलीय. म्हणून हे त्याच्या आवडीचं गाणं असल्याचं तो सांगतो. समीर गिटारिस्ट आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली तो गिटारवरच लावतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या गाण्यांमध्ये एक समान धागा दिसेल तो म्हणजे गिटार. त्याच्या प्रत्येक गाण्यात कुठे ना कुठे तरी गिटारची झलक दिसेलच.

समीरला इतर चॅनल्सच्या मालिकांच्या शीर्षकगीतांसाठीही विचारलं गेलं होतं. पण, काही कारणांमुळे ते जमून आलं नसल्याची माहिती तो देतो. ‘दिल दोस्ती दोबारा’ ही मालिका नुकतीच सुरू झाली. या मालिकेचं शीर्षकगीतही त्याने संगीतबद्ध केलंय. या नव्या मालिकेचं शीर्षकगीतही प्रेक्षकांना भावलंय. या मालिकेशिवाय आगामी ‘एफयू’ या सिनेमासाठी त्याने काम केलंय. शिवाय आणखी काही सिनेमांसाठी त्याचं काम सुरू आहे. समीरने संगीतबद्ध केलेल्या आतापर्यंतच्या शीर्षकगीतांमध्ये वैविध्य आहे. प्रत्येक मालिकेचा बाज ओळखून त्याने शीर्षकगीताला संगीत दिलंय. ‘खुलता..’च्या शीर्षकगीतात हळुवारपणा आहे तर ‘काहे दिया परदेस’च्या शीर्षकगीतात मुंबई आणि वाराणसीची झलक आहे. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’चं शीर्षकगीत खोडकरपणा दर्शवतं. आणि आता ‘दिल दोस्ती दोबारा’मध्ये मैत्री झळकतेय. समीरच्या कामाच्या या वैशिष्टय़ामुळे पुढेही अशी वैविध्यपूर्ण शीर्षकगीतं ऐकायला मिळतील यात शंका नाही!

response.lokprabha@expressindia.com
चैताली जोशी- @chaijoshi11
सौजन्य- लोकप्रभा