बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आणि अक्षय वर्दे यांचा काल (मंगळवारी) मुंबईत निकटवर्तीयांच्या उपस्थितीत लग्नसोहळा संपन्न झाला. माहाराष्ट्रीयन पारंपारीक पध्दतीने हा लग्नसोहळा पार पडला. फॅशन डिझायनर नीता लुल्लाने समीरासाठी वधू-पोषाख डिझाईन केला होता. लाल आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केलेली नव-वधू समीरा खचितच सुंदर दिसत होती. यावेळी समिराने हलकासा मेकअप केला होता.

फोटो अल्बम : समीरा रेड्डी आणि अक्षय वर्देचा लग्नसोहळा!

या लग्नसोहळ्यातील उपस्थितांमध्ये मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि डिझायनर निष्का लुल्लाचा समावेश होता. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी वर अक्षय एका आलिशान मोटरसायकलवर स्वार होऊन आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आपल्या डिझायनर बाईकच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात व्यस्त होणार असल्या कारणाने या वर्षी एप्रिल महिन्यात होणारा हा विवाह जानेवारीतच उरकण्यात आला.

समीरा रेड्डी आणि वर्देंची मोटरसायकलचे सह-मालक अक्षय वर्दे यांची जवळजवळ अडीच वर्षापूर्वी भेट झाली होती. या भेटीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वांद्रे येथील समीराच्या घरी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा साखरपुडा झाला होता.