२५ वर्षांनी पुन्हा एकदा ‘साजन’, संजय दत्त आणि माधुरी येणार एकत्र

अखेर आपला भूतकाळ विसरत दोघेही एकत्र काम करण्यास तयार झाले आहेत

बॉलिवूडमध्ये गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे संजय दत्त आणि माधुरी दीक्षित. ऑनस्क्रीन सुपरहिट ठरलेली ही जोडी रिअल लाइफमध्येही एकत्र होती असे म्हटले जात होते. दोघांचं प्रेमप्रकरणही चांगलंच गाजलं होतं. पण १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला शिक्षा झाली आणि नंतर दोघांमध्ये जो दुरावा झाला तो कायमचाच. पण आता अखेर २५ वर्षांनी दोघांनी आपल्यातील कटुता बाजूला ठेवत एकत्र येण्याचं ठरवलं आहे. करण जोहरने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली असून लवकरच त्याच्या चित्रपटात मुन्नाभाई आणि मोहिनीला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. अभिषेक वर्मन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. दोघे एकत्र येणार असल्याचं समजल्यापासून चाहत्यांसह बॉलिवूडमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

खरं तर या चित्रपटासाठी श्रीदेवीची निवड करण्यात आली होती, पण तिच्या अचानक जाण्याने मुख्य भूमिकेसाठी पुन्हा शोधाशोध सुरु झाली होती. अखेर माधुरीची निवड करण्यात आली. जान्हवी कपूरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माधुरीचे आभार मानले होते. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. सुरुवातील या चित्रपटाचं नाव ‘शिद्दत’ असल्याचं वृत्त होतं. पण नंतर करण जोहरने ट्विट करत नाव अद्याप ठरलं नसल्याचं स्पष्ट केलं.

श्रीदेवीच्या अचानक जाण्याने प्रोजेक्टचं काम थांबलं होतं. पण माधुरीने होकार दिल्यामुळे प्रोजेक्टवर पुन्हा एकदा काम सुरु झालं आहे. जान्हवी कपूरच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतरही अनेकांना माधुरीच्या नावाची शंका होती. पण अखेर करण जोहरने हे वृत्त खरं असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीचे नाव जरी सर्वांसमोर आले असले तरी अभिनेत्याचे नाव आजपर्यंत गुलदसत्यात ठेवण्यात आले होते. अखेर करणने ट्विट करुन या नावावरुन पडदा उठवला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरच्या टीमने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. करणने संजय दत्त आणि माधुरीला एकत्र काम करण्यासाठी तयार केलं असून पुढील महिन्यात चित्रपटाचं शूटिंग सुरु होईल. एप्रिल २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. सुत्रांनुसार, ‘माधुरी आणि संजय एकत्र काम करणार असल्याने सर्वांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. माधुरीने होकार दिल्यानंतर ती संजयसोबत काम करण्यास तयार होईल की नाही याबाबत अनेकजण साशंक होते. पण अखेर आपला भूतकाळ विसरत दोघेही काम करण्यास तयार झाले आहेत’.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay dutt and madhuri dixit to come together after 25 years