साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे चित्रीकरण या महिन्यात सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावदेखील निश्चित करण्यात आली आहे. मात्र चित्रीकरण सुरु होण्याच्या ऐनवेळी चित्रपटामधील कलाकरांमध्ये एक बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये सध्या प्रमुख कलाकारांची नावं निश्चित झाली असून यामध्ये अक्षय कुमार, क्रिती सनॉन, बमन इरानी, पूजा हेगडे आणि रितेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या कलाकारांव्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त देखील या चित्रपटात झळकणार होता. मात्र आता संजयऐवजी अन्य दुसऱ्या कलाकाराच्या नावाचा विचार करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे सुरू होणार असून या चित्रपटामध्ये संजय दत्त झळकणार होता. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार, आता संजयच्या जागी नाना पाटेकर यांच्या नावाचा विचार सुरु असून या चित्रपटामध्ये नाना दिसून येण्याची शक्यता आहेत.
‘हाऊसफुल ४’ साठी प्रथम संजय दत्तच्या नावाचा विचार करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्याला या चित्रपटाविषयी विचारणाही करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव संजयने हा चित्रपट नाकारल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे चित्रपटाच्या टीमकडून नानांचा विचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जर नानांची चित्रपटात एण्ट्री झाली तर पुन्हा एकदा अक्षय आणि नानांची केमिस्ट्री पाहता येईल.
दरम्यान, ‘हाऊसफुल ४’ पूर्वी या चित्रटाचे ३ भाग प्रदर्शित झाले असून या तीन्ही भागांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘हाऊसफुल ३’ हा चित्रपट ३ जून २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे लेखन तुषार हिरानंदानी आणि साजिद-फरहाद यांनी केले असून पटकथा साजिद- फरहाद यांनी लिहिली होती. ‘हाऊसफुल ३’ मध्येही रितेश देशमुख, अक्षय कुमार, बमन इरानी झळकले होते. तसेच त्यांच्याव्यतिरिक्त अभिषेक बच्चन, चंकी पांडे या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाची जादू चालविली होती. ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटाला हाऊसफुल १ आणि २ प्रमाणेच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र हाच प्रतिसाद ‘हाऊसफुल ४’ला मिळणार ही उत्सुकता निर्माण होणार आहे.