करोना विषाणूमुळे देशवासीयांची हालत अगदी बिकट झाली आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत इतर राज्यांमधील मजुरांसोबतच मुंबईतील डबेवाल्यांचा देखील विचार करावा अशी विनंती अभिनेता संजय दत्त याने केली आहे. डबेवाल्यांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे असे मत त्याने व्यक्त केले आहे.

अवश्य पाहा – सोनू सूद म्हणाला “मला चीनी लोकांची माहिती पाठवा”; जाणून घ्या काय आहे प्रकरण

काय म्हणाला संजय दत्त?

“डबेवाले गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांची सेवा करत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत आपण त्यांना मदत करायला हवी.” अशा आशयाचे ट्विट संजय दत्तने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना देखील या ट्विटमध्ये त्याने टॅग केले आहे. संजय दत्तचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांमध्ये शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडीओ पाहाच – महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का?

भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासात ९,९८५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. देशाच्या वेगवेगळया भागात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान देशात प्रथमच करोनामुक्त झालेल्यांची संख्या अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांच्या पुढे गेली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. १ लाख ३३ हजार रुग्णांवर अजूनही करोना व्हायरससाठी उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण ७,७४५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.