‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने यापूर्वीच आपल्या आगामी वेब सीरिजच्या घोषणा केल्या आहेत. त्यात आता ‘अनुराधा’ या नव्याकोऱ्या वेब सीरिजची भर पडली असून या वेब सीरिजचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. संजय जाधव दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर संजय जाधव ‘अनुराधा’च्या निमित्ताने प्रथमच वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहेत.

‘अनुराधा’बद्दल आणि तेजस्विनीसोबत पुन्हा एकदा काम करण्याबाबत दिग्दर्शक संजय जाधव सांगतात, “या वेब सीरिजबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही. एक सांगेन की, ही एक सस्पेन्स थ्रिलर असून माझ्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन प्रथमच काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि लवकरच ‘अनुराधा’ ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे तो म्हणजे माझी पहिली वेब सीरिज ‘प्लॅनेट मराठी’ सारख्या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्याने पहिल्या मराठी ओटीटी बहुमान मिळवला आहे.”

पुढे ते म्हणाले, ‘अनुराधा’मधील प्रत्येक कलाकार हा उत्कृष्ट अभिनय करणारा आहे. आणि तेजस्विनीबद्दल सांगायचं झालं तर यापूर्वीही मी तेजस्विनीसोबत अनेकदा काम केले आहे. ती एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याची ताकद तिच्यात आहे. मुळात मला तिच्या कामाची पद्धत माहित असल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे, ज्याने आमचं काम अतिशय सुरळीत पार पडतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही वेब सीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित होणार आहे, ही आमच्यासाठीही फार मोठी गोष्ट आहे. संजय जाधव यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. संजय नेहमीच वेगवेगळे, मनोरंजनात्मक विषय हाताळतो. त्यामुळे ‘अनुराधा’ही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. संजयचे दिग्दर्शन, मराठी सिनेसृष्टीतील अतिशय मुरलेले कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू या वेब सीरिजमध्ये आहेत. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी प्रेक्षकांना असाच दर्जेदार आशय देण्यासाठी नेहमीच बांधील राहील,” असे ‘प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.