बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने घसघशीत कमाई केली आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संजू’ने पहिल्याच दिवशी ३२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या वर्षातला हा धमाकेदार ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. कारण ‘संजू’ने सलमान खानचा ‘रेस ३’, दीपिका पादुकोण- रणवीर सिंगचा ‘पद्मावत’, टायगर श्रॉफचा ‘बागी २’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

सलमानच्या ‘रेस ३’नं पहिल्या दिवशी २९.१७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘बागी २’नं २५.१० कोटी रुपये आणि ‘पद्मावत’ने १९ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे ही कमाई पाहता ‘संजू’ हा चित्रपट रणबीरच्या करिअरचा तारणहार ठरला असं म्हणायला हरकत नाही.

Sanju Movie Review : बॉलिवूडचे मैदान फतह करणारा ‘संजू’

या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच परेश रावल, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल आणि जिम सर्भ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या काळात बॉक्स ऑफीस कमाईचे आणखी कोणकोणते रेकॉर्ड मोडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.