जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणिवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या विचारांच्या चित्रपटांची निर्मिती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर व संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘मराठी चित्रपटांनी नेहमीच पठडीबाहेरच्या विषयांना हात घालत, मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातूनही वेगळा विचार सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे’, असं निर्माते सतीश कौशिक यांनी सांगितले.

वाट्यास आलेले आयुष्य जगताना सकारात्मक जगण्याचा प्रयत्न केला, तर त्यातला खरा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो, हे ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं आहे.  दरम्यान, चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून निर्मिती निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा यांनी केली आहे.