भविष्यात दुष्काळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कलाकारमंडळी राज्यभरात जनजागृतीची मोहीम राबवताना दिसतात. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने यासाठी ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली. या उपक्रमामध्ये आता मराठी अभिनेता जितेंद्र जोशीही सहभागी झाला आहे. विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जितेंद्र जोशी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन समाजासाठी काम करताना दिसला. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेमध्ये सहभागी होऊन जितेंद्रने कळंब तालुक्यातील शेळका धानोरा गावातील सामान्य नागरिकांसोबत श्रमदान केले.

 

 पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेळका धानोरातील गावकरी रात्रीचा दिवस करून श्रमदानाचं करत आहेत.

कळंब तालुक्यातील या गावात दुष्काळामुळे सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. मात्र, पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावातील थोर मोठ्यांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केलाय. यासाठी गावकरी रात्रीचा दिवस करून श्रमदानाचं काम करत आहेत. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेने गावकऱ्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. त्यात सेलिब्रेटीचे हातही श्रमदानाला लागल्यामुळे गावकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकविण्याचा विश्वास धानोरा गावातील तरुण पिढीने व्यक्त केला.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उदभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन केलं होते. मागील वर्षी या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे यावर्षी ‘पानी फाउंडेशन’चा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तीस तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पाविषयी आमिर जीवाचे रान करत असताना मराठी पाऊल मागे नाही असेच म्हणावे लागेल.