आयुष्यातील एक प्रयोग असलेल्या संगीतामध्ये कलाकाराला घडविण्याचे काम समाज करत असतो. त्यामुळे कलाकाराने सदैव समाजाभिमुख असले पाहिजे, असे मत प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी शनिवारी व्यक्त केले.
कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवात ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या हस्ते शौनक अभिषेकी यांना पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पं. गुरव यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक कैवल्यकुमार गुरव, ट्रस्टच्या विश्वस्त भारती बऱ्हाटे, सीड इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र बऱ्हाटे या वेळी उपस्थित होते. शौनक अभिषेकी म्हणाले,‘‘ संगीतात काही अवतारी लोकं होऊन गेली. पं. संगमेश्वर गुरुजी हे त्यातीलच एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. आमच्यासाठी ते या क्षेत्रातील हिमालय असून त्यांच्या नावाने पुरकार मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार मिळण्याचे श्रेय हे गुरुंबरोबरच माझ्या आईचेही आहे.’’
अभिजात कलांमध्ये वारसा आणि परंपरा या महत्त्वाच्या आहेतच, पण त्याबरोबरीने कलेची साधनाही तितकीच महत्त्वाची आहे. सर्व कलांचा संगम या महोत्सवात अनुभवता आला, असे मत सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले.
शौनक अभिषेकी यांनी ‘गावती’ रागातील दोन बंदिशी सादर केल्या. कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या गायकीतून ‘यमन’ रागाचे सौंदर्य उलगडले. या दोन्ही कलाकारांना सुधांशू कुलकर्णी यांनी संवादिनीची आणि प्रशांत पांडव यांनी तबल्याची साथसंगत केली.