अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणाचा तपास सीबीआयची विशेष टीम करत आहे. त्यातच सुशांतला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी चाहते आणि काही सेलिब्रिटींनी केली आहे. विशेष म्हणजे सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेता शेखर सुमन यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यात त्यांनी रिया चक्रवर्तीलावर निशाणा साधत तिला प्रश्न विचारला आहे. “महागड्या वकिलांना फी देण्यासाठी स्पॉन्सर कोण?” सवाल शेखर सुमन यांनी ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर निदान काही काळासाठी तुम्ही त्याच्या कुटुंबीयांसोबत राहता. मात्र रियाने यु-टर्न घेतला आहे. तसंच रियाने तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात महागड्या वकिलांची नियुक्ती केली आहे. जर तिचं वार्षिक उत्पन्नचं केवळ १४ लाख रुपये आहे, तर इतक्या महागड्या वकिलांना फी देणं तिला कसं काय जमतं? तिला नेमकं कोण स्पॉन्सर करतंय?”, असा प्रश्न शेखर सुमन यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणतात, “सीबीआय त्यांच्या पद्धतीने योग्यरित्या तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल. मी कोणावरही थेट आरोप करत नाहीये. पण अनेकांकडे संशयाची सुई जात आहे. कारण चौकशी दरम्यान प्रत्येकाचं स्टेटमेंट वेगवेगळं आलेलं आहे. सिद्धार्थ पिथानीपासून ते रुग्णवाहिका चालकापर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. यात कोणाचीच वक्तव्य एकमेकांशी मेळ खात नाहीत. असं वाटतंय प्रत्येकाला एक भूमिका दिली होती. पण ते उपजत कलाकार नसल्यामुळे त्यांनी ती भूमिका नीट वठवता आली नाही”.

दरम्यान, यापूर्वीदेखील शेखर सुमन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच सुशांतला न्याय मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. इतकंच नाही तर कलाविश्वातील घराणेशाहीवरदेखील त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचं मत व्यक्त केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekhar suman questions rhea chakraborty on hiring expensive lawyer sushant singh rajput case ssj
First published on: 21-08-2020 at 16:23 IST