scorecardresearch

शेलारमामा चषक: कबड्डीसाठी सुशांत शेलारचा पुढाकार

वडिलांच्या स्मरणार्थ सुशांत शेलारने हे सामने भरविले आहेत.

शेलारमामा चषक: कबड्डीसाठी सुशांत शेलारचा पुढाकार

‘आयपीएल’ व ‘प्रो कबड्डी’ लीग स्पर्धेमध्ये बॉलीवूडमधील अनेक तारे–तारका संघ मालक झाले असतानाच सुशांत शेलार या मराठी अभिनेत्याने ‘कबड्डी’ या मराठमोळ्या मातीतल्या खेळासाठी पुढाकार घेतला आहे. एखाद्या अभिनेत्याने खेळासाठी पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गिरणगावात वाढलेल्या सुशांत शेलारची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून एक नाळ जोडली गेली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांने या ‘कबड्डी’ सामन्यांचे आयोजन केले आहे. सुशांत शेलारचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशांत शेलारने हे सामने भरविले आहेत. ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने १६ ते २० मार्च दरम्यान हे सामने गिरणगावात रंगणार आहेत.
‘शेलारमामा चषक’ सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ‘ब’ वर्गातील खेळाडूंसाठी हे सामने आहेत. अ वर्ग व खुल्या गटासाठी नेहमीच सामने आयोजित केले जातात. मात्र ‘ब’ वर्गासाठी फारसे सामने आयोजित केले जात नाहीत. ‘ब’ वर्गातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावं व त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ने हे सामने आयोजित केल्याची माहिती अभिनेता सुशांत शेलारने दिली.
श्रमिक जिमखाना, ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल डीलाईल रोड मुंबई १३ येथे हे सामने रंगणार आहेत. या सामन्यांसाठी चित्रपटसृष्टीतील व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिनेता सुशांत शेलारने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. आता ‘कबड्डी’ सामन्यांच्या माध्यमातून त्याने राबवलेली अभिनव कल्पना कबड्डीपटूंसाठी नवी दिशा देणारी असेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.