बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरू झाल्या होत्या. दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर शिल्पा आणि राजने हे आरोप खोटे असल्याचे म्हणत शर्लिन विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला. तसेच ५० कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मागणी केली. या प्रकरणी शर्लिनला नोटीस बजावण्यात आली. आता शर्लिनने या नोटीशीला उत्तर देत काय म्हटले आहे हे सांगितले.

शर्लिनने नुकतीच मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या नोटीसला काय उत्तर दिले याबाबत खुलासा केला. दरम्यान शर्लिन राज आणि शिल्पावर संतापली आहे. ‘तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही किती दिवस मला घाबरवणार आहात. तुम्हाला काय वाटतं पैशांचा वापर करुन तुम्ही तुमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमधून बाहेर पडाल? नाही असे काही होत नाही,’ असे शर्लिन म्हणाली.

पुढे शर्लिन म्हणाली, ‘आपल्या सर्वांना संविधनाने अधिकार दिला आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन करु शकत नाही. त्यांनी (राज आणि शिल्पाने) पाठवलेल्या नोटीसला आम्ही उत्तर दिले आहे. यात त्यांनी केलेले आरोप आणि सत्य काय आहे हे त्यांना आम्ही दाखवून दिले. आम्ही त्यांना आरसा दाखवला आहे’, असे शर्लिन म्हणाली. तसेच पुढे शर्लिनने मुंबई पोलीस लवकरच जबाब नोंदवायला बोलवतील असे म्हटले.

काय होते शर्लिनचे आरोप?

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शर्लिनने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक आरोप केले होते. राज कुंद्राने फसवणूक केली असून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्लिनने केला होता. एप्रिल २०२१ मध्ये देखील शर्लिनने राज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचने शर्लिनची चौकशी केली होती. या प्रकरणातील ती महत्त्वाची साक्षीदार असल्याचे म्हटले जात होते.