भारतात नाते संबंधांना फार मानले जाते. प्रत्येक नात्याची विशेष काळजी घेऊन ते जपणे आपल्याच हातात असते. आयुष्याप्रमाणे नात्यांमध्ये चढउतार येतचं असतात. गोड नात्यात कडवटपणा कधी येईल हे सांगता येत नाही. असाच काहीसा दुरावा बॉलीवूडमधील दोन बहिणींमध्ये आला आहे. आम्ही बोलतोय अनुषा आणि शिबानी दांडेकर या बहिणींविषयी.
इंग्रजी संगीताला प्राधान्य देणा-या ‘द स्टेज’ या भारतीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी दांडेकर हिने केले होते. या रियालिटी शोमध्ये विशाल ददलानी, मोनिका डोगरा, एशान नूरानी आणि देवराज सन्याल यांनी परिक्षकाची भूमिका साकारली होती. आता ही टीम पुन्हा एकदा परतली असून त्याचा दुसरा सिजन सुरु झाला आहे. या शोचा पहिला सिजन यशस्वी झाला होता. एका प्रसिद्ध वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, दुस-या सिजनच्या चित्रीकरणावेळी एका स्पर्धकाने शिबानीला तिच्या बहिणीच्या नावाने म्हणजेच अनुषाच्या नावाने हाक मारली. खरं तर झालं असं की, शिबानीने सदर स्पर्धकाचे नाव चुकीचे घेतले होते. आपल्या चुकीबाबत शिबानीने दिलगिरी व्यक्त केली. पण तिच्या माफीच्या बदल्यात स्पर्धकाने ‘ठीक आहे, अनुषा’ असे म्हटले. त्यावर शिबानीने लगेचच प्रत्युत्तर देत ‘मी शिबानी आहे. अनुषा कोण ?’ असे म्हटले. पण या सगळ्याचा शोवर काहीच परिणाम झाला नाही. उलट सदर घटनेनंतर सेटवर शिबानी आणि परीक्षकांपासून सगळेच हसू लागले.  मात्र, शिबानीने असे उत्तर का दिले असेल हा प्रश्न राहतोच. अनुषा ही तिची बहिण असल्याचे शिबानीने का सांगितले नाही याचा काहीच उलगडा झाला नाही. इंडस्ट्रीमधील काही व्यक्तिंनी या दोन्ही बहिणींमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे सांगितले आहे. त्यात या घटनेमुळे ही गोष्ट कुठेतरी खरी असल्याच्या वृत्ताला खतपाणी मिळाले आहे.
शिबानी, अनुषा आणि अपेक्षा या तिघीही बहिणी आहेत. शिबानी दांडेकर ही गायिका, अभिनेत्री, सूत्रसंचालक आणि मॉडेल म्हणून नावारुपास आली. तिने ‘टाइमपास’ या चित्रपटात ‘ही पोरी साजूक तुपातली’ हे गाणे केले होते. याव्यतिरीक्त तिने ‘संघर्ष’ या मराठी चित्रपटातही आयटम साँग केले होते. ‘रॉय’, ‘शानदार’ या चित्रपटांमध्ये शिबानी झळकली होती. ‘झलक दिखला जा’ च्या पाचव्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झालेली.