कलाविश्वामध्ये सौंदर्याला आणि फिटनेसला विशेष महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच अनेक अभिनेत्री प्रग्नंसीनंतर बॉडी शेमिंगच्या शिकार झाल्या आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे यामध्ये बॉलिवूडची फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे. बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनामुळे शिल्पाला महिलांनीच बॉडी शेमिंगवरुन टोला लगावला होता. ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पाने तिचा अनुभव सांगितला आहे.
शिल्पाला वियान नावाचा लहान मुलगा असून २०१२ मध्ये वियानचा जन्म झाला आहे. वियानचा जन्म झाल्यानंतर शिल्पाच्या शरीरात अनेक बदल झाले होते. तिचं वजन वाढलं होतं. त्यामुळे ती शक्यतो घराबाहेर जाणं टाळत होती. मात्र एकदा एका रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तिचं वाढलेलं वजन पाहून तेथे उपस्थित असलेल्या महिलांनीच तिची खिल्ली उडवली. ते पाहून शिल्पा प्रचंड दु:खी झाल्याचं तिने सांगितलं.
“वियानच्या जन्मानंतर माझं वजन ३२ किलोने वाढलं होतं. साधारणपणे केवळ १५ किलो वजन वाढेल असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र माझं वजन दुप्पट झालं होतं. मला नाही माहित हे वजन कसं वाढलं. परंतु वजन वाढल्यामुळे घरातून बाहेर निघत नव्हते. मात्र एकदा मी राजसोबत एक रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. तेथे गेल्यावर काही महिलांनी माझ्याकडे पाहून कुजबूज सुरु केली. त्यांची चर्चा मला स्पष्टपणे ऐकू येत होती”, असं शिल्पा म्हणाली.
पुढे ती म्हणते, “ही खरंच शिल्पा शेट्टी आहे? हिचं तर अजूनसुद्धा वजन वाढलेलंच आहे, असं या महिलांपैकी एक जण म्हणाली. ते ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि त्यावेळी मला जाणवलं की एक अभिनेत्री म्हणून मला कायम माझ्या फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल”.
दरम्यान, शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बऱ्याच वेळा ती सोशल मीडियावर तिच्या योगासन करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. शिल्पाना वियान आणि समीषा ही दोन मुलं आहेत.