रेश्मा राईकवार

श्री शिवराज अष्टक या संकल्पनेंतर्गत शिवकालीन इतिहासाची टप्प्याटप्प्याने आणि विविध मुद्दयांच्या आधारे मांडणी करत एकेक शौयर्म्कथा रसिकांसमोर आणणारी दिग्पाल लांजेकर यांची चित्रपट श्रृंखला आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या श्रृंखलेतील प्रत्येक चित्रपटाचा कथाविषय स्वतंत्र असला तरी त्याचे मूळ एकच आहे. मराठीत ऐतिहासिक चित्रपट अशा पद्धतीने मांडण्याची कल्पना आणि पडद्यावर कलाकृती साकारतानाचा संयमी, चिकित्सक मांडणीचा दृष्टिकोन ‘शिवरायांचा छावा’ हा या चित्रपट श्रृंखलेतील सहावा चित्रपट रसिकांसमोर आणताना दिग्पाल यांनी कसोशीने जपला आहे याची जाणीव चित्रपट पाहताना होते.

आजवर शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न, मावळयांना एकत्र करत घेतलेला कोंढाणा, रायगड, शाहिस्तेखान, अफझल खानसारख्या औरंगजेबाच्या दुष्ट सरदारांना साम, दाम, दंड सगळया प्रकारे, कधी मुत्सद्देगिरीने, कधी गनिमी काव्याने चारलेली धूळ अशा कैक गोष्टी दिग्पाल लांजेकर यांनी आजवरच्या पाच चित्रपटांमधून रंजक आणि प्रभावी पद्धतीने मांडल्या. आता स्वराज्याची सूत्रं संभाजी महाराजांच्या हातात आल्यानंतरचा इतिहास या चित्रपट श्रृंखलेतून पाहायला मिळणार आहे याची जाणीव ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिग्दर्शकाने करून दिली आहे. संभाजी राजांचा पराक्रम आगळा होता, त्यांचं व्यक्तित्व शिवरायांपेक्षा वेगळं. त्यामुळे त्यांची गोष्ट सांगताना हे भान जसं ठेवावं लागतं तसंच मराठेशाहीच्या इतिहासात संभाजी राजांनी अनुभवलेलं घरातलं, स्वराज्यातलं आणि स्वराज्याबाहेरचं राजकारण, त्यांच्या अवतीभवती असलेले नवे जुने सरदार आणि आपल्या भोवती असलेल्या सगळया परिस्थितीची पूर्ण कल्पना असताना त्याला मात देत राजांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या तर त्याचा पटच खूप मोठा. एखाद-दुसऱ्या चित्रपटात हा पूर्ण पट मांडणं अवघडच. त्यामुळे ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची सुरुवातच आधीचं सगळं राजकारण मागे ठेवून थेट संभाजी राजांच्या राज्याभिषेकाच्या घटनेपासून होते.

हेही वाचा >>> प्रयोग क्रमांक ५२५५..

संभाजी राजांच्या वेळची सामाजिक-राजकीय परिस्थिती, दख्खन आता सहज हाती येईल म्हणून निर्धास्त झालेला औरंगजेब, विविध मराठी मुलखात मुघली सरदारांनी जिझिया कराच्या नावाखाली माजवलेली दहशत, स्त्रियांवरचे अन्याय आणि हे अराजक वेळीच थांबवण्यासाठी राजांनी घेतलेले निर्णय या मांडणीत संभाजी राजांची अंगभूत हुशारी, शिवाजी महाराज आणि जिजाऊंची त्यांना सतत भासणारी उणीव असे कितीतरी पैलू सहजपणे प्रेक्षकांना आकळतील अशी सूचक मांडणी लांजेकर यांनी केली आहे. संभाजी राजांनी गाजवलेली बुऱ्हाणपूरची मोहीम या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र या मोहिमेमागे संभाजी राजांनी किती बारकाईने विचार केला होता, रणांगणावर शत्रूला गारद करण्याआधी त्याच्याभोवताली हळूहळू आपल्या डावपेचांचं जाळं रचून त्याला गाफील ठेवण्याची त्यांची कूटनीती, हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक यांची त्यांना लाभलेली साथ या गोष्टींवर भर दिल्याने चित्रपट प्रेक्षकांना धरून ठेवतो. अर्थातच, गेल्या पाच चित्रपटांमधून लांजेकर यांनी उभ्या केलेल्या शिवकालीन इतिहासातील व्यक्तिरेखा आणि ते साकारलेले कलाकार प्रेक्षकांच्या मनात इतके ठसले आहेत की या नव्या चित्रपटात त्या गोष्टी जोडलेल्या हव्या होत्या, असं प्रेक्षकांना वाटणं साहजिक आहे. नाही म्हणायला संभाजी राजांच्या आठवणीतून का होईना चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेले शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांची जिजाऊ आणि भूषण पाटील या नव्या दमाच्या अभिनेत्याने साकारलेले संभाजी महाराज यांचे काही एकत्रित प्रसंग अनुभवण्याची संधी चित्रपटात मिळते. मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांचा विचार न करता संभाजी राजांची शौर्यगाथा पूर्ण नव्या कलाकारांना बरोबर घेत जुन्याचा फार गाजावाजा न करता मांडण्याचं धाडस लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

 चित्रपटाच्या संवाद लेखनाची जबाबदारीही लांजेकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. चित्रपटाचे संवाद आधीच्या चित्रपटांपेक्षा थोडे अधिक पल्लेदार आहेत. सातत्याने हे पल्लेदार संवाद ऐकताना त्यातला सहजपणा निघून गेल्यासारखं वाटतं, मात्र त्याच वेळी जुन्या वळणाच्या मराठी शब्दांचा केलेला वापर कानाला सुखावह वाटतो. कलाकारांमध्ये जवळपास सगळेच चेहरे किमान लांजेकरांच्या चित्रपटात नव्याने पाहायला मिळतात. संभाजी राजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील याची निवड सार्थ ठरली आहे. संभाजी राजे काहीसे आक्रमक स्वभावाचे होते, पण म्हणून सातत्याने एका वरच्या पट्टीत संवाद ऐकवण्याचा प्रयत्न वर म्हटल्याप्रमाणे सहजपणा घालवून बसला आहे. येसूबाईंच्या भूमिकेला अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे असं म्हणता येणार नाही. काकर खानाच्या भूमिकेतील राहुल देव यांचा अभिनय लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. जोत्याजीच्या भूमिकेतील अभिजीत श्वेतचंद्र, रवी काळे यांचा बहिर्जी, विक्रम गायकवाड यांनी साकारलेला कवी कलश या छोटेखानी भूमिका अधिक सहज आणि प्रभावी वाटतात. चित्रपटातील गाणी, प्रसंग या सगळयाचीच आधीच्या तुलनेत भव्यदिव्य मांडणी करण्यात आली आहे. संभाजी राजांची ही शौर्यगाथा इथे संपणारी नाही, त्यांच्याबद्दलच्या सगळयाच गोष्टी अबालवृद्धांना परिचयाच्या आहेत. हे लक्षात घेऊन केवळ इतिहास मांडण्यापेक्षा रयतेचा राजा म्हणून त्यांनी घेतलेले धोरणी निर्णय, त्यांच्या शूरवीर सरदारांनी साथ देत गाजवलेला पराक्रम यावर दिग्दर्शकाने अधिक भर दिला असल्याने ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट अतिरंजक अनुभव ठरला आहे.

शिवरायांचा छावा

दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकार – भूषण पाटील, तृप्ती तोरडमल, रवी काळे, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, विक्रम गायकवाड, समीर धर्माधिकारी, राहुल देव, बिपीन सुर्वे.