‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादामध्ये करणी सेना, राजकीय पक्ष, सेन्सॉर बोर्ड, सेलिब्रिटी या साऱ्यांनी आपले मत मांडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विटसाठी ओळखल्या जाणाऱ्या शोभा डे यांनीही या वादात उडी घेतली आहे. चित्रपटाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर डे यांनी एक ट्विट केले असून त्यांनी यातून एकप्रकारे चित्रपटाची खिल्लीच उडवल्याचे दिसते.
मुलाखत वाचा : किती काळ गप्प बसायचं? – दीपिका पदुकोण
‘पद्मावती’ चित्रपटाच्या अनुषंगाने डे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी केवळ Waiting असं लिहिलं असून यासोबत त्यांनी ‘पद्मावती’चा एक पोस्टरही ट्विट केला. पण या पोस्टरवर ‘पद्मावती’च्या जागी ‘सद्मावती’ असं लिहिलं आहे. त्याचसोबत चित्रपटातील मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या जागी निरूपा रॉय यांचा फोटो लावण्यात आला आहे. आईच्या भूमिका साकारण्यासाठी नावाजेल्या निरुपा या नेहमीच दुःखी ‘सॅड मदर’ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यामुळेच त्यांचा फोटो डे यांनी ‘पद्मावती’ वादात आपले मत मांडण्यासाठी वापरला. पण, हा फोटो पोस्टर केल्यामुळे त्यांच्या विचारसरणीवर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.
वाचा : प्रभास, अनुष्काच्या नात्यातील आणखी एक सत्य उघड
दरम्यान, दिवसेंदिवस ‘पद्मावती’ चित्रपटाचा वाद अधिकच चिघळत चालला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही असा प्रश्न उभा राहिलाय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी खासदारांच्या समितीपुढे आपली बाजू मांडली. यात ‘पद्मावती’ हा चित्रपट कवितेवर आधारित असून, त्यातून इतिहासाची मोडतोड केलीच नसल्याचे स्पष्टीकरण भन्साळी यांनी दिले.