देशात करोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपलं जीवाभावाचं कुणी ना कुणी तरी गमावलं आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता अधिकच वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णांसोबतच मृत्यांच्या संख्येत होणारी वाढ काळजात धडकी भरवणारी आहे. गेल्या काही दिवसात करोनाच्या या लाटेमुळे अनेक कलाकारांना जीव गमवावा लागला आहे.

यात मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं देखील करोनामुळे निधन झालंय. अभिलाषाच्या निधनाच्या बातमीने कलाक्षेत्रात मोठा धक्का बसलाय. बनारसमध्ये अभिलाषा एका हिंदी वेब सीरिजचं शूटिंग करत होती. याच वेळी अचानक तिची तब्येत बिघडली. त्यानंतर ती मुंबईत परतली. मुंबईत परतल्यावर करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती अधिक खालावल्याने अभिलाषाला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मात्र करोनाशी दोन हात करताना अभिलाषाला माघार घ्यावी लागली. चार एप्रिलला अभिलाषाने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

अभिलाषाने ‘प्रवास’, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’, ‘पिप्सी’ अशा मराठी सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्याचसोबत तिने बापमाणूस या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली होती. याच सोबत ती ‘छिछोरे’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ अशा हिंदी सिनेमांसोबत काही हिंदी वेब सीरिजमध्ये झळकली होती.

अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावरून अभिलाषाच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय. ‘बापमाणूस’ या मालिकेत अभिलाषाने पल्लवीच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे पल्लवीने भावूक होत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. “खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस …. बापमाणूसला आपण भेटलो होतो… आई होतीस माझी. . ” नुसतं enjoy” असं म्हणून काम करायचीस … भूत काळात तुला संबोधताना त्रास होतोय…. जिथे असशील तिथे ही खूप कामं करत राहा..” असं पल्लवीने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

मराठी आणि हिंदी मालिकांसोबत सिनेमांमधून झळकलेल्या अभिलाषाचं करोनामुळे निधन झाल्याच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून अनेक मराठी आणि हिंदी कलाकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.