नदीम श्रवण या संगीतकार जोडीतले श्रवण यांचं काल करोनामुळे निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. करोना आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि ते दवाखान्यात उपचार घेत होते. आता अशी माहिती समोर येत आहे की, ते कुंभमेळ्याला गेले होते.

श्रवण आणि त्यांची पत्नी हे दोघेही कुंभमेळ्याला गेले होते. ते परत आल्यावर श्रवण यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यानंतर ते आणि त्यांची पत्नी या दोघांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. श्रवण यांचा मुलगा संजीवने याबद्दल माहिती दिली आहे. तो इंडियन एक्सप्रेसशी बोलत होता. तो म्हणाला, “आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्हाला अशा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. माझ्या वडिलांचं निधन झालं आहे, मी आणि माझी आई करोनाबाधित आहोत. माझ्या भावालाही करोनाची लागण झाली आहे आणि तो सध्या गृहविलगीकरणात आहे”.

हेही वाचा- संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनामुळे निधन

तो पुढे म्हणाला, “माझी आई विमलादेवी आणि मी एकत्रच आहोत. आम्ही दोघेही आता बरे होत आहोत. अशा काही अफवा ऐकायला मिळत आहेत की हॉस्पिटल आम्हाला आमच्या वडिलांचे शव देत नाहीत, तेही बिलाच्या समस्येमुळे..पण हे खरं नाही. हॉस्पिटलने आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे”.

श्रवण गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. काल रात्री त्यांचं निधन झालं.